प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील धोकादायक झाडे हटविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. यामुळे मागील आठवडय़ात झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील विविध भागात झाडांची पडझड झाली असून बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील जुनाट वृक्ष बुधवारी दुपारी कोसळल्याने काहीवेळ वाहतूक बंद झाली होती.
शहरातील बहुतांश भागात जीर्ण झालेली झाडे असून काही ठिकाणी मोठय़ा वृक्षांच्या फांद्या नागरिकांना धोकादायक बनल्या आहेत. यामुळे फांद्या हटविण्याची मागणी वारंवार करण्यात येते. पण याची दखल वनखात्याकडून घेतली जात नाही. याचा फटका नागरिकांना बसत आहे. पावसामुळे शहर आणि उपनगरांतील विविध भागात झाडे कोसळल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे जीर्ण झाडांची पाहणी करून हटविण्याची मागणी करण्यात आली होती. पण याची दखल वन खात्याने व महापालिका प्रशासनाने घेतली नाही. परिणामी ठिकठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत.
शहरातील रस्त्याच्या रुंदीकरणाकरिता चांगल्या झाडांची कत्तल करण्याची मोहीम वन खात्याकडून राबविण्यात येत आहे. पण जीर्ण झालेली झाडे हटविण्याची मागणी करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे क्लब रोड, बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर गोल्फ मैदान परिसरात झाडे कोसळली आहेत. हा प्रकार सध्या सुरूच असून बुधवारी दुपारी अरगन तलाव चौकानजीक बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर वृक्ष कोसळल्याने काही वेळाकरिता वाहतूक बंद झाली होती. हा रस्ता वर्दळीचा असून सतत वाहनांची ये-जा सुरू असते. पण दुपारची वेळ असल्याने कोणतीही हानी झाली नाही. वन खात्याला माहिती देण्यात आल्यानंतर सदर झाड पेनच्या साहाय्याने हटविण्यात आले. पण या रस्त्याशेजारी असंख्य धोकादायक झाडे असून वाहनधारकांना धोका आहे. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना राबविण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.









