बेळगाव ः
मंगळवारी कॅम्प येथे तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर दोघांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी बापट गल्लीतील नागरिक एकवटले होते. तसेच व्यापाऱयांनी सकाळी एक तास दुकाने बंद ठेवून या दुर्दैवी घटनेचा निषेध केला.
यावेळी अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा, असे उपस्थित जनतेचे म्हणणे होते. तसेच अशी दुर्दैवी घटना होत असताना जातपात न पाहता पीडितांच्या कुटुंबासोबत राहून ज्यांनी अत्याचार केला त्यांना कठोर शासन व्हावे. मग ते कोणत्याही जाती-धर्माचे असोत. यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
आपल्या परिसरात एखादी अनोळखी व्यक्ती संशयास्पद वाटल्यास त्वरित सावध व्हावे आणि अशा दुर्दैवी घटनांना आळा घालावा, असा ठराव सर्वसंमतीने मांडून या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी पंच, व्यापारी व नागरिक उपस्थित होते.









