प्रतिनिधी/ बेळगाव
रस्त्याशेजारी थांबलेल्या ट्रकला मोटारसायकलची पाठीमागून धडक बसून शनिवारी मध्यरात्री बहाद्दरवाडी क्रॉसजवळ झालेल्या अपघातात सोमवार पेठ, टिळकवाडी येथील तरुण जागीच ठार झाला. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
केतन श्यामकांत नाईक (वय 27) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव असून तो बीपीसीएल कंपनीत काम करीत होता. रेशीम उद्योगासंबंधी माहिती घेण्यासाठी मोटारसायकलवरून आपल्या मित्राला भेटण्यासाठी जात असताना बहाद्दरवाडी क्रॉसजवळ थांबलेल्या ट्रकला मोटारसायकलची पाठीमागून धडक बसून हा अपघात झाला. केतनच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. तो एकुलता मुलगा होता. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यक्रिया करण्यात आली. रक्षाविसर्जन मंगळवारी सकाळी 9.30 वाजता आहे.
हेल्मेट होते तरीही…
मोटारसायकलवरून जाताना केतनने हेल्मेट परिधान केले होते. तरीही अपघातात तो जागीच ठार झाला. अपघातात हेल्मेटची काच फुटल्याचे पोलिसांनी सांगितले. एकुलत्या मुलाच्या अपघाती निधनाने कुटुंबीयांवर आघात झाला आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.









