वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
शाहूनगर हद्दीजवळून गेलेला कंग्राळी बुद्रुक-कंग्राळी खुर्द रस्ता ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात खचलेला आहे. दोन्ही ठिकाणचे काँक्रिटीकरण अर्धवट असल्याने प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे. या संदर्भात अनेकवेळा वृत्तपत्रांतून आवाजही उठविला. पण या रस्त्याकडे ग्राम पंचायत आणि संबंधित अधिकाऱयांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. साधे मुरुम टाकून तरी रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे. पण ग्रा. पं. च्या प्रशासकीय अधिकाऱयांच्या लक्षात येते कुठे? येत्या चार-पाच दिवसात रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास ग्रा. पं. वर मोर्चा नेण्याचा इशारा प्रवाशांनी दिला आहे.
शाहूनगर व कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. कार्यक्षेत्राची हद्दीमधून सदर संपर्क रस्ता आहे. परिसरातील नागरिकांच्या निवेदनाचा विचार करून जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांच्या फंडातून या संपर्क रस्त्याचे ठिकठिकाणी काँक्रिटीकरण झाले. परंतु, दोन ठिकाणी मध्येच लोणचे फॅक्टरीजवळ 150 तर पार्वतीनगर शेवटच्या हद्दीपर्यंत 300 फूट रस्त्याचे काँक्रिटीकरण केलेच नाही.
दोन्ही ठिकाणी रस्ता अर्धवट ठेवण्याचे कारण नागरिकांना समजणे गरजेचे आहे. रस्ता दुरुस्ती करण्यासाठी अनेक वेळा ग्राम पंचायतचे उंबरठे झिजविले. परंतु, या समस्येकडे पंचायतीने कानाडोळा केल्यामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
खड्डय़ांमध्येच वृक्षारोपणाचा इशारा
लोकप्रतिनिधी व ग्रा. पं. च्या वरि÷ अधिकाऱयांनी दोन ठिकाणच्या खड्डेमय रस्त्याची पाहणी करून अर्धवट राहिलेले काँक्रिटीकरण पूर्ण करावे, अन्यथा खड्डय़ांमध्येच वृक्षारोपण करण्याचा इशारा परिसरातील नागरिक व प्रवाशांतून देण्यात आला आहे..









