दहा मार्चला पाच राज्यांतील निवडणुकांचा निकाल लागणार आहे. पण त्यापूर्वीच अजब गोष्टी घडत आहेत. राजधानीतून बघितले तर या गोष्टींमधील संदेश कळायला वेळ लागत नाही. कालपर्यंत भाजपचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आता जाहीरपणे सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याची कानउघाडणी करताना दिसत आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा शर्मा यांचा तीव्र शब्दात निषेध करत आहेत. तोही कशा करता? तर त्यांनी राहुल गांधींविषयी अपशब्द बोलल्याने. राहुल गांधींचा बाप काढल्याने.
‘कोणाचा बाप काढण्याची संस्कृती भाजपने आपल्या प्राचीन देशात आणली आहे का? ही भारतीय परंपरा आहे का? हिंदू धर्माचे संस्कार आणि संस्कृती अशी भाषा शिकवतात का हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगावे. तसे नसेल तर पंतप्रधानांनी ताबडतोब आसामच्या मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करावे’, अशी चंद्रशेखर राव यांची मागणी आहे. ते काँग्रेस आणि सोनिया गांधींचे राजकीय हितचिंतक खचितच नाहीत निदान आतापर्यंत कधी दिसले नाहीत. तरी त्यांनी हा मुद्दा उचललेला आहे. पंतप्रधानांनी नुकतीच जेव्हा हैदराबादला भेट दिली तेव्हा त्यांचे स्वागत करायला ते विमानतळावर गेले नाहीत. आपली प्रकृती बरी नाही असे कारण सांगून त्यांनी त्यांच्या एका सहकाऱयाला विमानतळावर पाठवले. स्थानिक भाजपचा तडफडाट झाला नसता तरंच नवल होते. रावसाहेबांना त्याची पर्वा नाही. ‘तुझे मिर्ची लगी तो मैं क्मया करुं।’ असाच त्यांचा पवित्रा आहे.

एव्हढेच नव्हे तर राफेल फायटर जेट खरेदीत मोठा घोटाळा झाला आहे आणि तो उघडा करण्यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहोत, असे ते म्हणत आहेत. विरोधी पक्षांची आघाडी बनवण्यासाठी चंद्रशेखर राव मुंबईला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला या आठवडय़ात येत आहेत. तर ‘मसाला डोसा’ खाण्याच्या निमित्ताने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हैद्राबादमध्ये त्यांना लवकरच भेटत आहेत.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन हे येत्या दोन महिन्यात गैरभाजप मुख्यमंत्रांची दिल्लीत परिषद बोलावून केंद्राविरुद्ध नवी आघाडी उघडायची चिन्हे आहेत. तामिळनाडू असो अथवा केरळ. भारत हा संघराज्य असल्याने राज्यांच्या हक्कांची पायमल्ली होता काम नये या आग्रही मताचे आहेत. मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे ‘कॉपरेटिव्ह फेडरॅलिसीम’ च्या गोष्टी करत असले तरी प्रत्यक्षात स्वतःचेच हात मजबूत करत आहेत अशी भावना बऱयाच गैरभाजप मुख्यमंत्र्यांच्या मनात घर करून आहे.
उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्ष विधान सभा निवडणुकीत भाजपशी कडवा मुकाबला करत असूनही तेथील प्रसारमाध्यमांमध्ये मात्र त्याचा फारसा उल्लेख दिसत नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दावणीला काही माध्यमांनी, विशेषतः वृत्तवाहिन्यांनी बांधून घेतले आहे असे आरोप होत आहेत. अशा वेळी या सरकारधार्जिण्या मीडिया ला एक्सपोझ करण्यासाठी अखिलेश हे तेथील पत्रकारांना ‘ईमानदार’ हे आभूषण लावतात. सध्याच्या नाजूक दिवसात ‘ईमानदार’ ही पत्रकार वर्तुळात एक अस्खलित शिवी झाली आहे. ‘सोच ईमानदार, काम दमदार’ ही योगी आदित्यनाथ यांची घोषणा आहे. 10 मार्चला जर उत्तर प्रदेशात आश्चर्यकारक निकाल लागले तर अखिलेश हे या वृत्त वाहिन्यांना चांगलाच धडा शिकवतील असे बोलले जाते. या सर्व प्रमुख वृत्तवाहिन्यांचे ऑफिस आणि स्टुडिओ दिल्लीत नसून त्याला जोडून असलेल्या उत्तरप्रदेशमधील नोएडात आहे.
केजरीवाल यांचा ऐनवेळी घात ?
पंजाबमधील निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसच्या तोंडाला फेस आणणाऱया अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा ऐन निवडणुकीच्या तोंडावर घात झाला कि काय अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. दशकापूर्वी अण्णा हजारेंच्या रामलीला मैदानातील आंदोलनात केजरीवाल यांचे घनिष्ट मित्र झालेल्या कुमार विश्वास यांनी एक गौप्यस्फोट करून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची एकप्रकारे बोलती बंद केली आहे. स्वतःला देशभक्त म्हणवणारे केजरीवाल म्हणजे प्रत्यक्षात एक ‘लबाड कोल्हा’ आहेत असा दावा करून विश्वास यांनी त्यांच्या देशभक्तीवरच प्रश्न उपस्थित केलेला आहे. पंजाबसारख्या सीमेलगत असणाऱया संवेदनशील राज्यात खलिस्तानसारख्या फुटीरवादी प्रवृत्तीविषयी फार नाराजी असल्याने कुमार विश्वास यांनी उभ्या केलेल्या वादाने जबर पेट घेतला आहे. पंतप्रधान आणि राहुल गांधींसह लहानमोठय़ा साऱया नेत्यांनी केजरीवाल यांना खिंडीत पकडले आहे. ज्या शीला दीक्षित यांची मुख्यमंत्री म्हणून दिल्लीतील सद्दी केजरीवाल यांनी संपवली त्यांचा माजी खासदार मुलगा संदीपने पंजाबमधील एका पोलीस ठाण्यात केजरीवाल यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. कुमार विश्वास हे आप पक्षाचे एक संस्थापक आहेत आणि तरीही त्यांना चार वर्षांपूर्वी केजरीवाल यांनी राज्यसभा सदस्य बनवले नव्हते. त्याचा वचपा कुमार यांनी काढला आहे.
अशाही परिस्थितीत जर पंजाबमध्ये आप यशस्वी झाली तर दोन राज्यात सरकारे असलेला एकमेव प्रादेशिक पक्ष केजरीवाल यांचा असेल गैर-भाजप पक्षात त्यांचा मग दबदबा वाढणारच. मनमोहन सिंग यांनी पंजाब निवडणुकीच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या हल्ल्याने भाजप विचलित झाली असतानाच सिंगापूरच्या पंतप्रधानांनी केलेल्या पंडित नेहरूंच्या भलावणीने सत्ताधारी गोटात हलकल्लोळ माजला आहे. सिंगापूरच्या संसदेत केलेल्या या भाषणात नेहरूंच्या नंतर भारतातील लोकशाहीत झालेल्या घसरणीचा उल्लेख आहे. काँग्रेसने ज्यांची ‘राजकीय सल्लागार’ म्हणून संभावना केली ते प्रशांत किशोर देखील आपल्याला अजून सुगीचे दिवस येणार म्हणून कामाला लागले आहेत. भाजप, काँग्रेस तसेच तृणमूल काँग्रेस, द्रमुक, जगन मोहन रेड्डी यांचा आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी पक्ष आणि इतर बऱयाच जणांबरोबर काम केल्याने किशोर यांची महत्वाकांक्षा जागृत झाली आहे. दूरदर्शनचा जमाना होता तेव्हा उत्तम आरोग्याचा मार्ग दाखवण्यासाठी ‘दस कदम’ कार्यक्रम टीव्ही वरून प्रसारित केला जात होता. आता ‘दहा मार्च’ ला कोणाची दिवाळी होणार आणि कोणाचे दिवाळे वाजणार याचा अदमास लावून सारे पक्ष ‘दस कदम’ कार्यक्रम करत आपले स्वास्थ सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. बदलत्या वाऱयाने कोणाच्या शिडात हवा भरणार आणि कोणाचे जहाज वादळात अडकणार ते लवकरच दिसणार आहे.
सुनील गाताडे








