वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय फुटबॉल संघाचे माजी प्रशिक्षक व बायचुंग भुतियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे आणलेल्या रुस्तम अक्रमोव्ह यांचे वयाच्या 73 व्या वर्षी उझ्बेकिस्तानमधील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.
1995 मध्ये भुतियाला त्यांनी प्रथम संधी दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने फिफा मानांकनात सर्वोत्तम स्थान मिळविले. 15 फेबुवारी रोजी त्यांचे निधन झाल्याचे उझ्बेकच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिकृत वेबसाईटवर सांगण्यात आले. या साईटवरून त्यांनी रुस्तम यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी आपल्या कारकिर्दीत उझ्बेक व माजी सोव्हिएत फुटबॉलच्या विकासासाठी फार मोठे योगदान दिले आहे. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशननेही त्यांच्या निधनाबद्दल आदरांजली वाहिली असून 1995 ते 1997 या कालावधीत ते भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक होते.
त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या अल्पशा कालावधीत भारताला एखादी स्पर्धा जिंकता आली नसली तरी सिक्कीमच्या बायचुंग भुतियाला 1995 मध्ये नेहरू चषक स्पर्धेत थायलंडविरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली होती. क्लब स्तरावर भुतिया मिडफील्डमध्ये आक्रमकाची भूमिका बजावत असे. पण अक्रमोव्ह यांनी त्याला स्ट्रायकर होण्यासाठी मोलाची मदत केली. त्यांच्या हाताखाली भारताचे काही उत्कृष्ट खेळाडू होते. त्यात आयएम विजयन, कार्लटन चॅपमन, बुनो कुटिन्हो व युवा भुतिया यांचा समावेश होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने फिफा मानांकनात मोठी प्रगती करीत टॉप शंभरमध्ये स्थान मिळविले. फेब्रुवारी 1996 मध्ये भारताने 94 व्या स्थानापर्यंत झेप घेतली होती. भारताचे हे आजवरचे सर्वोच्च मानांकन आहे. त्यानंतर 2017 व 2018 मध्ये भारताने (96 वा क्रमांक) या मानांकनाच्या जवळपास मजल मारली होती.
1948 मध्ये ताश्कंदमध्ये जन्मलेले अक्रमोव्ह स्वातंत्र्यानंतर उझ्बेकचे ते पहिले राष्ट्रीय प्रशिक्षक बनले. 1992-94 या दोन वर्षाच्या कालावधीत उझ्बेकने हिरोशिमा (1994) आशियाई क्रीडा स्पर्धेत तसेच सेंट्रल आशियाई चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले होते.









