गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांची प्रतिक्रिया
प्रतिनिधी/ मडगाव
उच्च न्यायालयाने पाच पालिकांची निवडणूक आरक्षण अधिसूचना रद्द करण्याचा दिलेला निवाडा शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरल्याने सरकारची नाचक्की झाली आहे. डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाचाच राजीनामा नव्हे, तर सार्वजनिक जीवनातून संन्यास घ्यावा, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.
फातोर्डा येथील पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरदेसाई यांनी वरील मागणी उचलून धरली. यावेळी उपाध्यक्ष दुर्गादास कामत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आधीच्या पालिका संचालकांना हटवून नवीन संचालकांची नियुक्ती करण्यात आली होती व त्यांना हाताशी धरून आपणास सोयीस्कर ठरेल अशा प्रकारे प्रभाग आरक्षण व फेररचना करण्यात आली होती. सदर त्रुटींवर उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयाने बोट ठेवून सरकारला 10 दिवसांच्या आंत सदर आरक्षण प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले.
लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी सरकार सर्वोच्च न्यायालयात गेल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी उच्च न्यायालयाच्या निवाडय़ावर दाद मागितल्यानंतर वक्तव्य केले होते, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले. हिदींत एक म्हण आहे ‘भगवान के घर देर है, पर अंधेर नही’. त्याचा प्रत्यय या निवाडय़ातून मिळाला असून भाजप सरकार व मुख्यमंत्र्यांना ही मोठी चपराक असल्याचे सरदेसाई म्हणाले.
सरकारी अधिकाऱयांना धडा
सरकारी अधिकाऱयासांठी हा निवाडा म्हणजे एक प्रकारचा धडा आणि समज असल्याचे सरदेसाई म्हणाले. काही सरकारी अधिकारी वाकायला सांगल्यास सरकार व नेत्यांपुढे रांगू लागतात आणि अशा प्रकारे लोकशाही कलंकित होते. सरकारी अधिकारी असेच वागू लागल्यास त्यांच्यावर दबाव आणून कामे करून घेणारे नेते नंतर त्यांचा बचाव करण्यासाठी पुढे येणार नाहीत याचे भान त्यांनी ठेवावे. अन्यथा त्यांना पेन्शनचा निधी त्यांच्यावरील खटले लढविण्यासाठी वकिलांवर खर्ची घालावा लागेल याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
घोळ घातल्यास पुन्हा न्यायालयात जाऊ
सरकारी अधिकाऱयांनी आता तरी निवडणूक प्रक्रिया कायदेशीररीत्या करावी. पुन्हा घोळ घालण्याचा प्रयत्न झाल्यास पुन्हा न्यायालयात दाद मागण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही आणि त्यावेळी अधिकाऱयांवरही खटला दाखल करणे भाग पडेल. मात्र तशी पाळी त्यांनी आमच्यावर आणू नये, असा इशारा सरदेसाई यांनी दिला. पक्षाचे उपाध्यक्ष कामत तसेच वकिलांनी सदर खटला सर्वोच्च न्यायालयात लढविण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांबद्दल सरदेसाई यांनी सर्वांचे आभार मानले.









