प्रतिनिधी/ पणजी
पाच नगरपालिका निवडणुकासंबधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश म्हणजे गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकरांना आदरांजली आहे. आज त्यांच्या जयंतीदिनी आलेल्या या ऐतिहासिक निर्णयाने गोमंतकीय लोकशाही साजरी करीत आहेत. बहुजन समाजाचे कैवारी व महिलांना स्वावलंबी बनविण्याचे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकरांचे प्रयत्न होते, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
उच्च न्यायालयाने 4 फेब्रुवारीची नगरपालिका संचालनालयाची अधिसूचना रद्दबातल केल्यानंतर आपण सदर आदेश म्हणजे ‘भाजपच्या अस्ताचा प्रारंभ’ असे म्हटले होते. आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने देशातील राजकारणात बदलाचे वारे वाहू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या जुमला राजकारणाला पुर्णविराम देण्याची आता वेळ आली आहे, असे दिगंबर कामत म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळी याप्रकरणी अंतरिम स्थगिती दिली, त्याच वेळी आपण राज्य निवडणूक आयोगाला घाई न करण्याचा सल्ला दिला होता. कुणाच्याही दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नका. आज शुक्रवारपर्यंतच्या दिवसापर्यंत वाट पाहिली तर ‘आभाळ कोसळणार नाही’ असे आपण त्याच दिवशी म्हटले होते. दुर्देवाने राज्य निवडणूक आयोगांने सर्व नियम धाब्यावर बसवून निर्णय घेतले व आज तोंडघशी पडले. गोव्यातील भाजप सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे. केवळ आपल्या स्वार्थासाठी ईर्षेला पेटून भाजप सरकारने जनतेचा पैसा खर्च करुन कारण नसताना उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सरकारने जनतेची जाहिर माफी मागावी. आजच्या निवाडय़ाने देशातील सर्व राज्यांना निवडणूक आयोगाची स्वायत्तता अबाधित राखण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत असे दिगंबर कामत यांनी सांगीतले.









