आभा गुप्ता यांचे आवाहन : नूतन पदाधिकाऱयांचा पदग्रहण समारंभ
प्रतिनिधी / बेळगाव
मोठी स्वप्ने व उदात्त ध्येयपूर्ततेसाठी इनरव्हील सदस्यांनी सतत कार्यक्षम रहावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा आभा गुप्ता यांनी केले. इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्यावतीने 48 व्या इनरव्हील डिस्ट्रीक्ट 317 असेंब्ली, प्रारंभ-‘एक नई शुरूवात’चे आयोजन नुकतेच झूम माध्यमातून करण्यात आले.
क्लबच्या माजी अध्यक्षा रत्ना बेहरे यांनी इनरव्हील डिस्ट्रीक्ट 317 च्या चेअरपर्सन म्हणून पदभार स्वीकारला. डिस्ट्रीक्ट 317 मध्ये उत्तर कर्नाटक, गोवा व दक्षिण महाराष्ट्रातील 59 क्लब समाविष्ट आहेत.
राष्ट्रीय इनरव्हील असोसिएशनच्या माजी खजिनदार स्मिता शिरगावकर यांनी रत्ना बेहरे यांना अधिकारपदाची सूत्रे दिली. त्यानंतर नूतन पदाधिकाऱयांचा पदग्रहण कार्यक्रम झाला. त्यांना आभा गुप्ता यांनी कर्तव्ये समजावून
सांगितली.
नूतन अध्यक्षा रत्ना बेहरे यांनी आपल्या भाषणामध्ये आंतरराष्ट्रीय इनरव्हील थीम ‘थिंक फर्स्ट-स्ट्रॉंग वूमन स्ट्राँगर वर्ल्ड’ बाबत विवेचन केले. त्यांनी आपल्या दोन हजारहून अधिक सदस्यांना आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण या क्षेत्रासाठी उपक्रम हाती घेण्याचे आवाहन केले.
इनरव्हील क्लब बेळगावच्या विद्यमान अध्यक्षा शर्मिला कोरे, कार्यवाह मंजिरी पाटील, असेंब्लीच्या कार्यवाह लता कित्तूर, अध्यक्षा सोनल धामणकर, कार्यवाह मनाली देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होत्या. स्मिता दळवी व आसावरी संत यांनी सूत्रसंचालन केले.









