प्रतिनिधी/ नागठाणे
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मदिवशी आजची पहिली सहकार परिषद होत आहे. देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्व मोठे असून सहकाराच्या माध्यमातून वंचित व दुर्लक्षित घटकांच्या उद्धाराचे काम करणे गरजेचे झाले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी केले.
‘सहकारातून समृद्धीकडे’ या उपक्रमाअंतर्गत नुकतीच ऑनलाइन पहिली सहकार परिषद सातारा येथे पार पडली. या ऑनलाइन सहकार परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. या सहकार परिषदेचे आयोजन नाबार्ड मार्फत करण्यात आले होते.
यावेळी पुढे बोलताना अमित शहा म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टी ठेऊन स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना केली. देशातील आर्थिक दुर्बल घटक, वंचित, दलित, शेतकरी व महिला यांच्या विकासाचा मार्ग केवळ सहकाराच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. त्यासाठी सहकार क्षेत्रात काम करताना त्यात पारदर्शीपणा महत्वाचा आहे. देशात सहकार क्षेत्रात यापूर्वीही काम सुरू होते. मात्र आता त्याच्या दिशा व्यापक कराव्या लागणार आहेत.
सहकारातून समृद्धीकडे हे ब्रीदवाक्य देशातील प्रत्येक गावात रुजवून प्रत्येक गाव समृद्ध बनविणे व त्यातूनच देश समृद्ध बनविणे हीच या सहकाराची प्रमुख भूमिका आहे असे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले.
या ऑनलाईन सहकार परिषदेला सातारा जिल्हा खरेदी-विक्री संघाचे पदाधिकारी, अधिकारी, सर्व तालुक्यातील खरेदी-विक्री संघाचे पदाधिकारी, अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. ही ऑनलाईन सहकार परिषद यशस्वी करण्यासाठी नाबार्डचे रिजनल मॅनेजर पुनीत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी गौरव सिंग व तानाजी नलावडे यांनी परिश्रम घेतले.









