सुरक्षा रक्षकाला रोखावी लागली बंदूक
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील भवानीपूर या मतदारसंघात प्रचाराच्या अखेरच्या दिनी म्हणजेच सोमवारी मोठा वाद झाला आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने संघर्ष झाला आहे. दोन्ही पक्षांनी पस्परांवर हल्ल्याचे आरोप केले आहेत. तृणमूल कार्यकर्त्यांनी भाजप नेते दिलीप घोष यांच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यादरम्यान स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षारक्षकाला बंदूक रोखावी लागल्याचे एका चित्रफितीत दिसून आले आहे.
या मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवत असल्याने तृणमूलने प्रचारात पूर्ण जोर लावला आहे. भाजप नेते आणि कार्यकर्ते मतदारसंघात प्रचार करत असताना तृणमूल कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
संघर्ष चुरशीचा आहे, तृणमूल काँग्रेस घाबरल्यानेच मारहाणीचा आधार घेत आहे. आमचे खासदार अर्जुन सिंह प्रचार करत असताना तृणमूल कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठलाग तसेच धक्काबुक्की केल्याचे भाजप खासदार दिलीप घोष यांनी म्हटले आहे. तर निवडणूक आयोगाने या घटनेप्रकरणी प्रशासनाकडून अहवाल मागविला आहे.
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना भवानीपूर पोटनिवडणुकीत एक लाख मतांनी विजयी होण्याचा विश्वास असताना मतदारसंघात गुंडगिरी का केली जात आहे? बंगाल भाजप नेत्यांना प्रचारापासून रोखण्यात येत आहे. भवानीपूरमध्ये नंदीग्रामची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे का असा सवाल उपस्थित करत अर्जुन सिंह यांनी तृणमूलला लक्ष्य केले आहे.









