शहरात कंत्राटदाराद्वारे भू-भाडे वसुली : उशिरा
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील भाजी विपेते व फेरीवाल्यांकडून भू-भाडे वसुलीसाठी महापालिकेने मागील वषी निविदा काढली होती. मात्र तांत्रिक अडचणीमुळे निविदा मंजूर करण्यात आली नाही. तब्बल दहा महिन्यानंतर निविदेतील कंत्राटदाराला भू-भाडे वसुलीचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे दि. 19 पासून कंत्राटदाराद्वारे भू-भाडे वसुली सुरू आहे. पण वर्षानंतर कंत्राटदाराला आदेश देण्यामागचे गौडबंगाल काय, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
भू-भाडे वसुलीची जबाबदारी कंत्राटदारावर सोपविण्यात येते. याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र मध्यंतरी महापालिकेच्या कर्मचाऱयांकरवी भू-भाडे वसुली मोहीम राबविण्यात आली होती. पण अपेक्षेप्रमाणे भू-भाडे वसुली झाली नाही. त्यामुळे पुन्हा कंत्राट पद्धतीने भू-भाडे वसुली करण्यासाठी निविदा काढून कंत्राट देण्यात आले होते. मागील वषी डिसेंबर महिन्यात निविदेची मुदत संपुष्टात आली होती. त्यापूर्वी महापालिकेने ई-निविदा काढून भू-भाडे वसुलीसाठी निविदा मागविल्या होत्या. दि. 15 ऑक्टोबर 2019 रोजी सदर निविदा काढण्यात आली होती. या निविदा प्रक्रियेत चार कंत्राटदारांनी भाग घेतला होता. सदर निविदा 9 डिसेंबर 2019 रोजी उघडण्यात आली होती. त्यामध्ये वर्षाला 53 लाख बोली लावण्यात आली होती. पण तांत्रिक अडचणींमुळे महापालिकेने भू-भाडे वसुलीकरिता आदेश दिला नव्हता. सदर निविदा प्रलंबित ठेवण्यात आली होती.
त्यानंतर फेबुवारीमध्ये लॉकडाऊन झाल्याने भू-भाडे वसुली बंद ठेवण्यात आली होती. मात्र जूनपासून अनलॉक झाल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱयांकरवी भू-भाडे वसुली करण्यात येत होती. पण अपेक्षेप्रमाणे भू-भाडे वसुली होत नसल्याचे निदर्शनास आल्याने कंत्राट पद्धतीने भू-भाडे वसुली करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. पण नव्याने निविदा न मागविता जुन्याच निविदा प्रक्रियेतील सर्वाधिक बोली लावलेल्या कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आले आहे. 53 लाख रुपये भू-भाडय़ाची रक्कम जीएसटी 9 लाख आणि अनामत रक्कम अशी एकूण 65 लाखाची रक्कम सदर कंत्राट मिळविण्यासाठी कंत्राटदाराने महापालिकेच्या खजिन्यात जमा केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे भू-भाडे वसुलीचे कंत्राट देण्यात आले असून दि. 19 ऑक्टोबर पासून कंत्राटदाराद्वारे भू-भाडे वसुली करण्यात येत आहे.









