प्रतिनिधी/ बेळगाव
पेट्रोलचा दुरूपयोग टाळण्यासाठी बिसलरी बॉटलमध्ये पेट्रोल देण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता केवळ वाहनांमध्येच पेट्रोल घालण्यात यावा. किरकोळ विक्री करण्यात येवू नये अशी नोटीस पेट्रोल पंप चालकांना बजावण्यात आल्याने कॅनमध्ये पेट्रोल देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. यामुळे जनरेटर तसेच शेतकऱयांना पेट्रोल मिळणे मुश्कील बनले आहे.
पेट्रोल हा घातक द्रव असल्याने याचा वापर जपून करणे आवश्यक आहे. पण पेट्रोलचा दुरूपयोग होत असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच कमी जाडीच्या बिस्लरी पाण्याच्या बाटलीमधून पेट्रोल नेताना उन्हामुळे बस्ट होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे कमी जाडीच्या बाटलीमध्ये पेट्रोल घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र कॅन किंवा जाड बाटलीमध्ये किरकोळ पेट्रोल देण्यात येत होते.पण आता जाडी बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल देण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. किरकोळ पेट्रोल देण्यास पेट्रोल पंपावर टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. काही व्यवसायिकांना जनरेटरकरीता पेट्रोलची आवश्यकता भासते त्यामुळे किरकोळ पेट्रोल घेतला जातो. तसेच शेतामध्ये पाण्याच्या पंपासाठी किंवा औषध मारण्याच्या पंपासाठी पेट्रोलची आवश्यकता असते. त्यामुळे कॅन किंवा बॉटलमधून किरकोळ पेट्रोल घेत असतात. तसेच दुचाकी वाहन अचानकपणे पेट्रोल संपल्यास बंद पडते. अशावेळी बॉटलमध्ये पेट्रोल घेतले जाते. पण आता बॉटल व कॅन मध्ये किरकोळ पेट्रोल देण्यास मज्जाव करण्यात येत असल्याने गैरसोय झाली आहे. अचानक वाहन बंद पडलेल्या नागरिकांनी काय करायचे असा मुद्दा उपस्थित झाला आहे. लांबवर रस्त्यात दुचाकी वाहन बंद पडल्यास इतर वाहनामधून दुचाकी वाहन पेट्रोल पंपापर्यंत आणण्याची वेळ आली आहे. किंवा धक्का मारत पेट्रोल पंपापर्यंत यावे लागत आहे. त्यामुळे किरकोळ पेट्रोल विक्रीच्या बंदीचा फटका नागरिकांना बसत आहे. याबाबत पेट्रोल पंप चालकांकडे चौकशी केली असता पोलीस प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आल्याने किरकोळ विक्री बंद करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. बॉटल, कॅनमध्ये किरकोळ पेट्रोल देण्यात येवू नये. जर किरकोळ विक्री केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा नोटीसीद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या पेट्रोलपंपाटवर किरकोळ पेट्रोल विक्री बंद करण्यात आली आहे.









