शहरातील भरवस्तीतील भोगाळेतील घटनेने खळबळ
चिपळूण
शहरात एका तरूण परिचारिकेला बळजबरीने ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडली. यावेळी प्रतिकार करणाऱया पीडितेला या नराधमाने बेदम मारहाण केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. सुसंस्कृत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱया शहरात बलात्कारासारखी घटना घडल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. या पीडितेवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरातील भोगाळे या रहदारीच्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱयासह श्वानपथक व ठसेतज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 25 वर्षीय तरूणी शहरातील एका रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करते. गुरुवारी सायंकाळी ती आपल्या घरातून रुग्णालयात जात होती. सायंकाळी 7.30च्या शहरातील भोगाळे येथे लॉकडाऊनमुळे निर्मनुष्य असलेल्या परिस्थितीचा फायदा घेत एका नराधमाने पीडितेला पाठीमागून पकडले. यावेळी ती ओरडू नये यासाठी तिचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने ओढत रस्त्याच्या कडेला निर्जनस्थळी अंधारात नेले. त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. यावेळी विरोध करणाऱया पीडितेला या नराधमाने दगडाने व हाताने मारहाण केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. यानंतर हा नराधम तेथून पसार झाला आहे.
या निंदनीय प्रकारानंतर पीडित तरूणीने शहरातील पोलीस स्थानकात तक्रार दिली. मारहाणीत जखमी व या घटनेमुळे मानसिक धक्का बसलेल्या या पीडित तरूणीवर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेनंतर शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग रत्नागिरीतून चिपळुणात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ठसेतज्ञ व श्वानपथकही दाखल झाले होते. मात्र पावसामुळे माग काढणे कठीण झाल्याने श्वानपथक माघारी फिरले. या नराधमाला जेरबंद करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी तपास यंत्रणा गतिमान केली आहे. कोविड काळात कोरोना योद्धा म्हणून महत्वाची भूमिका बजावणाऱया एका परिचारिकेवरच बलात्कारासारखी घटना घडल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.









