अहमदाबाद / वृत्तसंस्था
गुजरातमधील साबरमती नदीत कोरोनाचा विषाणू आढळून आल्यामुळे आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. अहमदाबादच्या मध्यभागी असलेल्या साबरमतीच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. या सर्वांमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. साबरमती व्यतिरिक्त अहमदाबादचे दोन मोठे तलाव कांकरिया आणि चांदोलामध्येही कोरोना विषाणूचे जीवाणू आढळले आहेत. आता नैसर्गिक पाण्यातही कोरोनाचे विषाणू दिसू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आयआयटी गांधीनगरने अहमदाबादमधील साबरमती नदीतून पाण्याचे नमुने घेतले होते. साबरमती नदीतून 694 नमुने, कांकरिया तलावातील 549 आणि चांदोला तलावामधून 402 नमुने घेण्यात आले. या नमुन्यांमध्ये कोरोना विषाणू आढळला आहे. नैसर्गिक पाण्यातही विषाणू टिकू शकतो, असा दावा संशोधनात व्यक्त करण्यात आला आहे. तसेच व्हायरसचे बरेच गंभीर म्युटेशन कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये दिसून येत असल्यामुळे देशातील सर्व नैसर्गिक जलस्त्राsतांचे नमुने घ्यावेत, असा सल्ला आयआयटीमधील प्राध्यापक मनीष कुमार यांनी दिला आहे.









