नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय सेनेच्या दहशतवादविरोधी कारवाईत 13 नागरिकांचा बळी जाण्याची भीषण घटना नागालँड राज्यात घडली आहे. मोन जिल्हय़ाच्या तिरु या खेडय़ात हा प्रकार घडला. नागालँड सरकारने चौकशीसाठी विशेष कृती दलाची (एसआयटी) स्थापना केली असून भारतीय सेनेनेही चौकशी न्यायालय स्थापन केले आहे.
नागालँडमध्ये दहशतवाद्यांचा एक गट हालचाली करीत आहे, अशी माहिती सेनेला गुप्तचरांकडून मिळाली. हा गट उद्ध्वस्त करण्यासाठी सैनिकांच्या तुकडय़ा पाठविण्यात आल्या. तिरु या खेडय़ानजीक सैनिकांनी सापळा रचला होता. तथापि, दहशतवादी समजून त्यांनी नागरिकांच्या एका गटावरच गोळीबार केला. त्यात 13 जण प्राणास मुकले. या घटनेनंतर राज्यभर तीव्र पडसाद उमटले असून तणावाचे वातावरण आहे. काही स्थानांवर संतप्त जमावाकडून जाळपोळ करण्यात आली.
सेनेकडून खेद व्यक्त
या प्रकारामुळे भारतीय सेनेने अधिकृतरित्या खेद व्यक्त केला असून चौकशीसाठी सेना न्यायालयाची (कोर्ट मार्शल) स्थापना केली आहे. या घटनेची उच्च पातळीवर चौकशी करुन दोषींना शिक्षा केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. या घटनेत सेनेचेही अनेक सैनिक जखमी झाले असून एका सैनिकाचा मृत्यू झाला आहे, असेही सेनेच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
गावकऱ्यांची निदर्शने
रविवारी घडलेल्या या घटनेनंतर तिरु गावातील नागरिकांनी निदर्शने केली. या घटनेत प्राणास मुकलेले तरुण निरपराध होते, असे गावकऱयांचे म्हणणे आहे. या तरुणांचा फुटीर संघटनांशी किंवा दहशतवादाशी कोणताही संबंध नव्हता, असाही दावा नागरिकांनी केला. ठार झालेल्या लोकांची ओळख पटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होती. हे लोक त्या स्थानी का जमले होते, हे चौकशीनंतरच समजणार आहे. राज्य सरकारनेही चौकशीसाठी कृती दलाची स्थापना केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून निषेध
नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी ही घटना दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मृत झालेल्या निरपराध नागरिकांना न्याय दिला जाईल. या घटनेत जखमी झालेल्यांवर चांगल्यातील चांगले उपचार राज्य सरकारकडून केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
सेनेकडून स्पष्टीकरण
तिरु भागात सेनेकडून विशिष्ट कारवाई करण्यात येत होती. ही कारवाई शनिवारपासूनच सुरु झाली होती. या भागात दहशतवादी आणि उग्रवाद्यांच्या हालचाली वाढल्या होत्या. त्यांच्यामुळे सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे ही धडक कारवाई हाती घेण्यात आली होती. तथापि, लक्ष्य ओळखण्यात चूक झाली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्राणास मुकावे लागले. ही चूक नेमकी कोणाकडून झाली हे चौकशीअंती समजून येईल, असे सेना प्रवक्त्याने स्पष्ट केले.
अमित शहांना खेद
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेवर खेद व्यक्त केला आहे. राज्य सरकार व सेनेकडून चौकशी यंत्रणांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. निरपराधी नागरिकांना न्यग्नाय देण्यात येईल. राज्य सरकारनेही पावले उचलली आहेत. केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असे शहा यांच्या संदेशात स्पष्ट करण्यात आले.
बव्हंशी नागा नागरिक
या घटनेत बळी पडलेल्या युवकांपैकी बव्हंशी नागा आहेत, असे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. या घटनेचे पडसाद कसे उमटतील याची चिंता राज्य सरकारला आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रयत्न करण्यात येत असून ज्येष्ठ नागा नागरिकांचे साहाय्य घेण्यात येत आहे. घटना कशी घडली याची माहिती देऊन समाजात प्रक्षोभ उसळू नये, याची दक्षता घेण्यात येत आहे.
दुर्दैवी घटना…
ड दहशतवादाविरोधात कारवाई करताना चुकीने नागरिकांवर गोळीबार
ड मृतांपैकी बव्हंशी नागा समाजाचे युवक, सैनिकाचाही हल्ल्यात मृत्यू
ड घटनेनंतर संतप्त पडसाद, नागरिकांची निदर्शने, काही स्थानी जाळपोळ
ड चौकशी समित्या लवकरात लवकर अहवाल सादर करतील ही अपेक्षा









