कमांडर राजीव कुबल, मंगेश सामंत यांचा पुढाकार
प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
मालवण तालुक्मयातील कुंभारमाठ येथील माळावर राहणाऱया आदिवासी कातकरी समाजातील 14 कुटुंबांना ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ स्वयंसेवी संस्था आणि मुंबई येथील ‘उर्जा मुव्हमेंट’ यांच्यावतीने 35 हजार रुपये किमतीच्या जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले, अशी माहिती ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत यांनी दिली.
लळीत म्हणाले की, मालवण पॉलिटेक्निकसमोर असलेल्या कुंभारमाठ माळरानावर 40 ते 50 वर्षांपासून आदिवासी कातकरी समाजबांधवांची वस्ती आहे. येथे 14 कुटुंबाच्या झोपडय़ा असून ही सर्व मंडळी मोलमजुरी करणारी व हातावर पोट असणारी आहेत. तौक्ते वादळाचा फटका बसून यापैकी काही झोपडय़ा उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळाली. या वस्तीला भेट दिल्यावर सर्वच झोपडय़ांमध्ये पाणी गेल्याने धान्य आणि अन्य साहित्याचे नुकसान झाल्याचे दिसून आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रा. श्रीधर पेडणेकर व प्रसाद जळवी उपस्थित होते. वादळाला दोन आठवडे उलटून गेल्यावरही या वस्तीवरील रहिवाशांना कोणतीही मदत मिळालेली नाही, असे लक्षात आल्यावर मुंबईतील ‘उर्जा मुव्हमेंट’चे निवृत्त नौदल अधिकारी कमांडर राजीव कुबल आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश सामंत यांना त्याची कल्पना दिली. मालवण येथील टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलले कुबल व सामंत यांनी या कुटुंबांना मदत करण्याबाबत अनुकूलता दाखवली.
त्यानुसार ‘घुंगुरकाठी’च्या माध्यमातून या 14 कातकरी कुटुंबांना प्रत्येकी 25 किलोच्या एकूण 35 हजार रुपयांच्या गृहोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते प्रा. श्रीधर पेडणेकर, प्रसाद जळवी यांनी या
कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमाला मालवण येथील सामाजिक कार्यकर्ते हरी केळुसकर, संतोष लुडबे, दिशा जमदाडे उपस्थित होते.
कुबल यांचा ‘झूम’द्वारे संवाद
कमांडर राजीव कुबल व मंगेश सामंत यांनी यावेळी मुंबई येथून झूम मिटिंगद्वारे कातकरी बांधवांशी संवाद साधला. यापुढेही ‘घुंगुरकाठी’ व ‘उर्जा’मार्फत मदतकार्य व अन्य सामाजिक उपक्रम सुरू ठेवण्याचा मनोदय कुबल यांनी व्यक्त केला. यामध्ये कुबल यांचे टोपीवाला हायस्कूलमधील सहाध्यायी नंदकिशोर महाजन, दिनेश साळसकर, सुरेश मयेकर सहभागी झाले होते. tamp









