गोव्यात सात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित
प्रतिनिधी / मडगाव
कोविड-19 महामारीत ऑक्सिजनचे महत्व सर्वांना कळून चुकले. कोविडच्या दुसऱया लाटेत ऑक्सिजन अभावी अनेकांचे बळी गेले. त्याचेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विविध भागात ऑक्सिजन पुरविण्याची घोषणा केली व या घोषणेची पूर्तता काल नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली. मडगावच्या ईएसआय हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्र सरकार तर्फे पंतप्रधान निधी अंतर्गत गोवा वैद्यकीय महाविद्यालयात 3, उत्तर गोव्यातील म्हापसा जिल्हा इस्पितळ 1, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात2 व ईएसआय इस्पितळात 1 मिळून एकूण 7 ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आले. त्यामुळे गोवा ऑक्सिजन संदर्भात स्वयंपूर्ण झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
देशाच्या विविध भागात ऑक्सिजन प्लांट काल गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने कार्यान्वित केले. गोव्यात मडगावच्या ईएसआय इस्पितळ आणि दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रितसर उद्घाटन केले. यावेळी महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, ईएसआय इस्पितळाचे प्रमुख डॉ. विश्वजीत फळदेसाई, हॉस्पिसियो इस्पितळाच्या अधीक्षक डॉ. आयरा आल्मेदा, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या प्रमुख डॉ. दीपा देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते.
कोविडच्या दुसऱया लाटेत आरोग्य खात्याला ऑक्सिजनची कमतरता भासली. त्यावर मात करण्यासाठी सरकारने परराज्यातून ऑक्सिजन टँकर आणण्यासाठी आरोग्य सेवेतील डॉक्टर, सरकारी सेवेतील अधिकारी, आयएएस अधिकाऱयांकडून देखरेख केली जात होती. नंतरच्या काळात काही सीएसआर संस्था, कंपन्या आरोग्य खात्याला सहकार्य करण्यासाठी पुढे सरसावले व त्यांनी इस्पितळांना ऑक्सिजन प्लांट उपलब्ध करून दिले.
कोविड लसीचा पहिला टप्पा पूर्ण
गोव्यात लोकांनी कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण केला असून 31 ऑक्टोबरपर्यंत लसीकरणाचा दुसरा टप्पाही पूर्ण केला जाणार आहे. त्यासाठी लोकांनी सहकार्य करावे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी म्हणाले.
आत्ता आरोग्य सेवेत सक्षम सुविधा
कोविड महामारीच्या काळात आरोग्य खात्याने मोठे आव्हान स्वीकारले होते. डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचाऱयांनी जोखमीची कामगिरी करून टप्प्या टप्प्याने कोविडच्या स्थितीवर नियंत्रण मिळविले आहे. आत्ता आरोग्य सेवेत सक्षम साधन-सुविधा उलपब्ध करून दिलेल्या आहेत. सरकारच्या सहकार्याने आरोग्य खाते आत्ता तिसऱया लाटेसाठी सज्ज असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यावेळी बोलताना म्हणाले.
मानवनिर्मित आपत्ती घडविणाऱया शक्ती गोव्यात दाखल
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात मानवनिर्मित आपत्ती घडविणाऱया शक्ती दाखल झालेल्या असून अजून काही येण्याच्या बाकी आहेत. अशा शक्ती पासून लोकांनी सावध राहिले पाहिजे. या बाहय़ शक्तीच्या विरोधात गोवेकरांनी एकजूट दाखवावी असे आवाहन केले.
कोविड महामारीच्या काळात गोव्यात बरीच आपत्ती निर्माण झाली होती. त्यावर आरोग्य खात्याने मात केली. पण, सद्या मानवनिर्मित आपत्ती घडविणाऱया शक्ती दाखल होत आहेत. त्याच्यापासून धोका संभवण्याची शक्यता आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या नावाचा उल्लेख केला नाही.









