अदानी समूह, पिरामल हेल्थकेअर खरेदीसाठी उत्सुक- सरकारकडून मागवण्यात आली बेली
वृत्तसंस्था/ मुंबई
एअर इंडियानंतर सरकार आता आणखी एक सरकारी कंपनी विक्री करण्याच्या तयारीला लागली असल्याचे समजते. लवकरच एचएलएल लाइफकेअर ही कंपनीही खासगी कंपनीकडे सुपूर्द केली जाणार असल्याची चर्चा आहे.
एचएलएल लाइफकेअर लिमिटेडमध्ये सरकार आपली संपूर्ण हिस्सेदारी विक्री करणार आहे. त्यामुळे ही कंपनी देखील आता खासगी तत्वावर हस्तांतरीत केली जाण्याच्या वृत्ताला बळ मिळताना दिसते आहे. सदरची कंपनी विकत घेण्यासाठी अदानी समूह व पिरामल हेल्थकेअर यांची इच्छा दर्शवली असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार एचएलएलच्या विक्रीसाठी सरकार लवकरच अदानी समूह, औषध क्षेत्रातील पिरामल एंटरप्रायझेस, अपोलो ग्रुप ऑफ हॉस्पीटल्स तसेच मेघा इंजिनियरिंग अँड
इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्याकडून बोली मागू शकते.
यासंदर्भातली प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यताही बोलली जात आहे. यासंदर्भातल्या प्रत्यक्षात प्रक्रियेला खरंतर डिसेंबरमध्येच सुरूवात झाल्याचे समजते. 14 डिसेंबरला सरकारने आरोग्यसंबंधीत एका सार्वजनिक उपक्रमांतर्गत 100 टक्के हिस्सेदारीसाठी बोली मागवली होती. यासाठीची अंतिम तारीख आधी 31 जानेवारी होती, ती नंतर 28 फेब्रुवारी व 14 मार्चपर्यंत वाढवण्यात आली होती.
कंपनीचा इतिहास
सदरच्या कंपनीचा इतिहास येथे जाणुन घेणे महत्त्वाचे ठरेल. सदरची कंपनी 1 मार्च 1966 ला हिंदुस्थान लेटेक्स लिमिटेड नावाने अस्तित्वात आली होती. कंपनीचा पहिला प्लांट 1967 मध्ये केरळमध्ये सुरू झाला नंतर 5 एप्रिल 1969 ला कंपनीने जपानमधील ओकोमोटो इंडस्ट्रिजसोबत भागीदारी केली. 2009 मध्ये हिंदुस्थान लेटेक्स लिमिटेडचे नाव बदलून एचएलएल लाइफकेअर लिमिटेड असे ठेवण्यात आले.









