क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
सलग दोन विजय नोंदविलेल्या ओडिशा एफसीवर 2-1 गोलानी विजय नेंदवून केरळ ब्लास्टर्सने आयएसएल फुटबॉल स्पर्धेत शानदार विजय नोंदविला. काल हा सामना वास्कोच्या टिळक मैदानावर खेळविण्यात आला. केरळ ब्लास्टर्सचा हा स्पर्धेतील पहिलाच विजय आहे. त्यांच्या आल्वारो वाझक्विझ आणि प्रशांत कारुथाडातकुनीने प्रत्येकी एक गोल नोंदविला तर पराभूत ओडिशाचा एकमेव गोल निखीलने केला. केरळ ब्लास्टर्सचे आता चार सामन्यांतून 5 गुण तर ओडिशा एफसीचे तीन सामन्यांतून 6 गुण झाले.
पहिल्या सत्रातील लढतीवर केरळ ब्लास्टर्सचे वर्चस्व होते. लढतीच्या आरंभालाच सहाल समदने हाणलेला फटका ओडिशा एफसीचा गोलरक्षक कमलजीत सिंगने ब्लॉक केला व संघावर होणारा संभाव्य गोल वाचविला. त्यानंतर ओडिशा एफसीने आपली सामन्यातील पहिली धोकादायक चाल 25व्या मिनिटाला केली. यावेळी झेवियर हर्नांडिझचा फटका केरळ ब्लास्टर्सच्या गोल पोस्टवरून गेला.
मध्यंतरापूर्वी प्रथम केरळ ब्लास्टर्सचा कप्तान जेसल कार्नेरोचा फटका गोलमध्ये जात असताना किंचित हुकला व नंतर ओडिशा एफसीच्या हँड्री अँटोनेचा गोल करण्याचा यत्न केरळ ब्लास्टर्सचा गोलरक्षक आल्बिनो गोम्सने उधळून लावला. दुसऱया सत्रात सहाल समदने ओडिशा एफसीच्या दोन बचावपटूंना गुंगरा देत ऍड्रियान लुना याला चेंडू दिला. मात्र यावेळी लूनाचा फटका गोलमध्ये जात असताना किंचित गोलपोस्टच्या बाजूने गेला.
लढतीच्या 62व्या मिनिटाला केरळ ब्लास्टर्सने गोल करून आघाडी घेतली. यावेळी ऍड्रियान लुनाने दिलेल्या पासवर आल्वारो वाझक्विझने गोलरक्षक कमलजीत सिंकला भेदले आणि चेंडू जाळीत पाठविला. त्यानंतर पाचच मिनिटानी केरळ ब्लास्टर्सची आपली आघाडी वाढविण्याची संधी हुकली. यावेळी आल्वारो वाझक्विझने हाणलेला फटका कमलजित सिंगने अडविला. लढतीच्या 85व्या मिनिटाला केरळ ब्लास्टर्सने दुसरा गोल करून आपली आघाडी वाढविली. हा गोल प्रशांत कारुथाडाथकुनीने केला.
आजचा सामना : जमशेदपूर एफसी विरूद्ध एटीके मोहन बागान (बांबोळी ऍथलेटीक स्टेडियम – सायंकाळी 7.30 वाजता).









