क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
पणजी जिमखानाच्या मेंबर्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठीच्या लिलावामध्ये मुख्तार कद्री हा सर्वांत महागडा क्रिकेटपटू ठरला. त्याला धेंपो चॅलेंजर्सने 45 लाख पॉईंटसेने खरेदी केले. बाळे टायगर्स, धेंपो चॅलेंजर्स, मानस मर्वीक्स, एलपीके इलेव्हन आणि प्रॅस्कोन पँथर्स असे सहा संघ जानेवारीच्या दुसऱया आठवडय़ात होणाऱया टी-20 क्रिकेट स्पर्धेत भाग घेत आहेत. या लिलावात 109 क्रिकेटपटू होते.
17 वर्षीय युवा क्रिकेटपटू आर्यन माशेलकर याला धेंपो चॅलेंजर्सने आपल्या संघात घेतली आहे. देविदास खोलकर याला 42.4 लाख पॉईंट्सनी एलपीके एकादशने तर दत्तेश प्रियोळकरला 42.2 लाख पॉईंट्सने मानस मर्वीक्सने करारबद्ध केले आहे. 19 वर्षांखालील गोवा क्रिकेट संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मनीष पै काकोडेला 40.25 लाख पॉईंट्सनी एलपीके एकादशने घेतले आहे. या स्पर्धेसाठी संघांच्या जर्सीचे अनावरण बाळे टायगर्सचे मालक आश्विन चंडोक, मानस मर्वीक्सचे तन्मय खोलकर, एलपीके एकादशचे मालक नंदन कुडचडकर, प्रॅस्कोन पँथर्सचे विनय केडिया आणि धेंपो चॅलेंजर्सचे मालक श्रीनिवास धेंपो यांच्या उपस्थितीत झाले.









