ऑनलाईन टीम / पुणे :
अभिनेता अनिकेत विश्वासराव याची पत्नी स्नेहा विश्वासरावने पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याची तक्रार अलंकार पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरुन पती अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रकांत विश्वासराव, सासू आदिती विश्वासराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत विश्वासरावने 10 डिसेंबर 2018 ते 2 फेब्रुवारी 2021 या तीन वर्षाच्या काळात सिनेमा सृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर पत्नीला अपमानास्पद वागणूक दिली. तिचा मानसिक छळ करण्यात आला. तसेच गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी सासू-सासऱ्यांनीही अनिकेत विश्वासरावला मदत केल्याचे पत्नी स्नेहाने पोलीस तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरुन अनिकेत विश्वासरावसह सासू-सासऱ्यांवर कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








