किमती साडय़ांसह कपडे पळविले : भीतीचे वातावरण
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
अलतगा येथे बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरात घुसून चोरटय़ांनी 20 हजार रुपये किमतीच्या साडय़ा व कपडे रात्री 2 वाजता चोरी केल्याचे उघडकीस आल्यामुळे नागरिकांतून भीतीचे वातावरण पसरले आहे. लक्ष्मी गल्ली, अलतगा येथील मनोहर शट्टू पाटील यांच्या घरी रात्री 2 ते 2.30 च्या दरम्यान चोरी झाल्याचे सांगण्यात आले. मनोहर यांनी आपल्या जुन्या घराच्या बाजूला नवीन घर बांधले आहे.
नवीन घराची वास्तुशांती झाल्यानंतर ते नवीन घरात वास्तव्यास होते. मंगळवारी सकाळी ते जुन्या घराकडे गेले असता त्यांना समोरील दरवाजाची कडी कोयंडा मोडल्याचे दिसून आले. त्यांनी घरात पाहिले असता घरातील तिजोरी नसल्याचे दिसून आले. चोरटय़ांनी तिजोरीमध्ये सोने, चांदी व रुपये असणार असून आपणाला आता मोठा डल्ला मिळणार म्हणून तिजोरी परसातून शेतवडीकडे उचलून नेऊन तेथे उघडून पाहिले असता चोरटय़ांना काहीच मिळाले नाही. परंतु तिजोरीमध्ये किमती नवीन कपडे व नवीन साडय़ा मात्र चोरटय़ांनी लांबविल्या. जुने कपडे व साडय़ा तेथेच टाकून चोरटय़ांनी पोबारा केल्याचे दिसून आले. यामध्ये जवळजवळ 20 हजार रुपयांचे कपडे व साडय़ा मात्र चोरटे घेऊन पळून गेल्याचे दिसून आले.
एकाच रात्रीत दोन घटना
अलतगा येथे सोमवारी एकाच रात्रीत मनोहर पाटील यांच्या जुन्या घराची कडी कोयंडा तोडून चोरी करणे तर दुसऱया घटनेत अनिल पाटील यांच्या शेतातील भात मळणीला आग लावून भात व पिंजर जाळण्याचा प्रकार घडल्यामुळे नागरिकांतून भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस खात्याने चोरटय़ांचा व आग लावणाऱया समाजकंटकांचा शोध घेऊन नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.









