आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा ः भारताचा अफगाणिस्तानवर 66 धावांनी एकतर्फी विजय
वृत्तसंस्था/ अबु धाबी
रोहित शर्मा (47 चेंडूत 74) व केएल राहुल (48 चेंडूत 69) यांच्या 140 धावांच्या फ्लाईंग स्टार्टच्या बळावर भारताने आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-12 फेरीत अफगाणिस्तानचा 66 धावांनी फडशा पाडला. भारतासाठी हा या स्पर्धेतील पहिलावहिला विजय ठरला. भारताने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 20 षटकात 2 बाद 210 धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानला 7 बाद 144 धावांवर समाधान मानावे लागले.
विजयासाठी 211 धावांचे कडवे आव्हान असताना अफगाणचे सलामीवीर झॅझॅई (13), शहझाद (0) अतिशय स्वस्तात परतले आणि तोच कित्ता पुढील सर्व फलंदाजांनी गिरवला. गुरबाझ (19), गुलाबदिन (18), झॅद्रन (11) ठरावीक अंतराने बाद झाले. मोहम्मद नबी (32 चेंडूत 35) व करीम जनत (22 चेंडूत नाबाद 42) यांनी जोरदार फटकेबाजी केली. पण, तोवर हा सामना अफगाणच्या हातातून निसटला होता.
भारतीय संघातर्फे शमीने एकदा एकाच षटकात 21 धावा मोजल्या. पण, नंतर त्याचे एकत्रित पृथक्करण 4 षटकात 32 धावात 3 बळी, असे किफायतशीर राहिले. या स्पर्धेत प्रथमच संधी मिळालेल्या अश्विनने 4 षटकात 14 धावात 2 बळी घेत उपयुक्तता दाखवून दिली. बुमराह व जडेजा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
रोहित-राहुलची बेधडक फलंदाजी

तत्पूर्वी, रोहित शर्माने आपल्या बेधडक खेळाची प्रचिती देत चौफेर फटकेबाजी केल्यानंतर भारताने 2 बाद 210 धावांचा डोंगर रचला. केएल राहुलची खेळी देखील तितकीच तोलामोलाची ठरली. अफगाणच्या प्रतितास 130 किमी वेगाने मारा करणाऱया मध्यमगती गोलंदाजांना चेंडू स्विंग करता येत नसल्याची मोठी किंमत मोजावी लागली.
लागोपाठ अपयशामुळे डिवचल्या गेलेल्या रोहित-केएल राहुल या जोडीला सूर सापडला आणि त्यांचा एकेक फटका अफगाणी गोलंदाजीवर आसूड ओढत गेला. मध्यमगती गोलंदाज अपयशी ठरणार, अशी लक्षणे दिसताच अफगाणचा नबीने ऑफ ब्रेक गोलंदाजी सुरु केली आणि दुसऱया बाजूने डावखुरा फिरकीपटू अश्रफला आणले. पण, फिरकी गोलंदाजीही तितकीच चोख खेळू शकणाऱया रोहित-राहुलसाठी ही देखील पर्वणीच होती आणि त्यांनी आपल्या टप्प्यात आलेल्या एकाही चेंडूची गय केली नाही.
रोहितने मध्यमगती गोलंदाज नवीन हकचे स्वागत देखील पॉईंटच्या दिशेने चौकार फटकावत केले आणि केएल राहुलने स्ट्रेट सिक्स लगावत आपला आक्रमक इरादाही स्पष्ट केला. भारताने पहिल्या 5 षटकातच 50 धावा फलकावर लावल्या. पण, पॉवर प्लेच्या शेवटच्या म्हणजे डावातील 6 व्या षटकात हमिद हसनने प्रतिस्पर्धी सलामीवीरांच्या फटकेबाजीला थोडा लगाम लावला. अर्थात, यानंतरही संघाने पहिल्या 10 षटकांपर्यंत 85 धावांची मजल मारली आणि त्यानंतर धावगती आणखी वाढवली.
रोहितने गुलाबदिनला थर्डमॅनच्या दिशेने फटकावल्यानंतर नवीनच्या गोलंदाजीवर स्क्वेअर कटचा फटका लगावत आपले 23 वे टी-20 आंतरराष्ट्रीय अर्धशतक साजरे केले. रशिद खानचा (0-36) 4 षटकांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर देखील ही जोडी मैदानावर होती. रोहित नंतर करीमच्या गोलंदाजीवर एक्स्ट्रा कव्हरवरुन फटका मारण्याच्या प्रयत्नात नबीकडे झेल देत परतला तर 7 धावांच्या अंतराने राहुल गुलाबदिनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. गुलाबदिनचा यष्टीवरील चेंडू ऑफ स्टम्पच्या दिशेने शफल करण्याचा राहुलचा प्रयत्न सपशेल फसला होता.
तिसऱया स्थानी बढतीवर आलेल्या रिषभ पंतची फटकेबाजीही लक्षवेधी ठरली. आपले तिन्ही षटकार एकहाती मारणाऱया या डावखुऱया फलंदाजाने अवघ्या 13 चेंडूत नाबाद 27 धावांचे योगदान दिले. हार्दिक पंडय़ाला मिळालेला सूर बराच दिलासादायक ठरला. पंडय़ाने वैभवशाली फलंदाजीची उत्तम चुणूक दाखवून देत 13 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 35 धावांची आतषबाजी केली.
पहिल्यावहिल्या विजयाला विक्रमाचे कोंदण!
भारतीय सलामीवीरांना येथे प्रथमच सूर सापडला आणि याच बळावर भारताने आयसीसी विश्वचषकाच्या या हंगामातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही नोंदवला. संथ व मंदगती गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणारे संघ 150-170 धावांच्या आसपासच मजल मारु शकत असल्याने जवळपास सर्व सामने त्याच आवाक्यातील राहिले. येथे मात्र भारताने सलामीवीरांच्या 140 धावांच्या फ्लाईंग स्टार्टमुळे अगदी सहजपणे 200 धावांचा टप्पा पार केला.
हार्दिक पंडय़ा-पंतने 3.3 षटकात 63 धावा झोडपल्या!
पूर्ण तंदुरुस्त नसलेल्या हार्दिक पंडय़ाला पहिल्या दोन्ही सामन्यात खेळवण्याचा अट्टहास भारताला नडला होता. येथे मात्र याच पंडय़ाने अफगाणच्या गोलंदाजांची अक्षरशः चौफेर धुलाई करत 13 चेंडूतच नाबाद 35 धावांची आतषबाजी केली. पंडय़ा व पंत यांनी केवळ 3.3 षटकातच 63 धावांची जोरदार भागीदारी नोंदवली.
भारताची वाटचाल अद्याप बिकटच!
विराटच्या नेतृत्वाखाली भारताने येथे अफगाणविरुद्ध एकतर्फी विजय नोंदवला असला तरी उपांत्य फेरीतील स्थान निश्चितीसाठी संघाला अद्याप बरीच दिव्ये पार करावी लागणार आहेत. एकीकडे, स्कॉटलंड व नामिबिया या संघाविरुद्ध एकतर्फी विजय संपादन करतानाच अफगाणचा संघ न्यूझीलंडला नमवेल, अशी अपेक्षा विराटसेनेला या स्पर्धेत करावी लागणार आहे. असे झाले तरच भारताला उपांत्य फेरीत स्थान मिळण्याची अपेक्षा करता येईल.
धावफलक
भारत ः केएल राहुल त्रि. गो. गुलाबदिन नईब 69 (48 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), रोहित शर्मा झे. नबी, गो. करीम जनत 74 (47 चेंडूत 8 चौकार, 3 षटकार), रिषभ पंत नाबाद 27 (13 चेंडूत 1 चौकार, 3 षटकार), हार्दिक पंडय़ा नाबाद 35 (13 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार). अवांतर 5. एकूण 20 षटकात 2 बाद 210.
गडी बाद होण्याचा क्रम
1-140 (रोहित, 14.4), 2-147 (केएल राहुल, 16.3).
गोलंदाजी
मोहम्मद नबी 1-0-7-0, शरफुद्दिन अश्रफ 2-0-25-0, नवीन-उल-हक 4-0-59-0, हमीद हसन 4-0-34-0, गुलाबदिन नईब 4-0-39-1, रशिद खान 4-0-36-0, करीम जनत 1-0-7-1.
अफगाणिस्तान ः हझरतुल्लाह झे. शार्दुल, गो. बुमराह 13 (15 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), मोहम्मद शहझाद झे. अश्विन, गो. शमी 0 (4 चेंडू), रहमनुल्लाह गुरबाझ झे. पंडय़ा, गो. जडेजा 19 (10 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), गुलाबदिन नईब पायचीत गो. अश्विन 18 (20 चेंडूत 3 चौकार), झॅद्रन त्रि. गो. अश्विन 11 (13 चेंडूत 1 षटकार), मोहम्मद नबी झे. जडेजा, गो. शमी 35 (32 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), करीम जनत नाबाद 42 (22 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), रशिद खान झे. पंडय़ा, गो. शमी 0 (1 चेंडू), शरफुद्दिन अश्रफ नाबाद 2 (3 चेंडू). अवांतर 4. एकूण 20 षटकात 7 बाद
144.
गडी बाद होण्याचा क्रम
1-13 (शहझाद, 2.6), 2-13 (झॅझॅई, 3.1), 3-48 (गुरबाझ, 6.5), 4-59 (गुलाबदिन, 9.3), 5-69 (झॅद्रन, 11.5), 6-126 (नबी, 18.1), 7-127 (रशिद, 18.3).
गोलंदाजी
शमी 4-0-32-3, जसप्रित बुमराह 4-0-25-1, हार्दिक पंडय़ा 2-0-23-0, रविंद्र जडेजा 3-0-19-1, रविचंद्रन अश्विन 4-0-14-2, शार्दुल ठाकुर 3-0-31-0.









