ग्लासगो
आशियाई विकास बँक दक्षिण पूर्व आशियातील क्षेत्रामध्ये जलवायू संबंधीत प्रकल्पांना समर्थन देण्यासाठी 66.5 कोटी डॉलरचा आर्थिक निधी जमवणार आहे. एडीबीने स्कॉटलँडमधील ग्लासगोमध्ये सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्र जलवायू बदल परिषदेमध्ये यासंबंधीची घोषणा केली आहे.
एडीबीच्या माहितीनुसार ब्रिटनमधून 15.1 कोटी डॉलर, इटलीच्या सरकारी बँकेने 15.5 कोटी डॉलर युरोपीयन संघाकडून 5.8 कोटी डॉलर आणि ग्रीन क्लायमेंट फंडमधून 30 कोटी डॉलरचा निधी प्राप्त होणार असल्याची माहिती आहे.
एडीबीचे अध्यक्ष मासात्सुगु असाकावा यांनी म्हटल्याप्रमाणे येणाऱया काळात दक्षिण पूर्व आशियातील देशांना हरितकरणाची संधी असणार आहे. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे संवर्धन करण्याची गरज वाढणार आहे. यारकरीताच पर्यावरण नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हरित प्रकल्पांकरीता जास्तीत जास्त गुंतवणूक अपेक्षीत असून शाश्वत पर्यावरणासह पायाभूत सुविधा उभारल्या जाण्याची गरज त्यांनी अधोरेखीत केली.
दक्षिण आशियाई देशांच्या संघटनांकडून चालू आर्थिक वर्षात कार्बन उत्सर्जनात कपात करणार असल्याची योजना आखण्यात आली आहे. याकरीताच आर्थिक निधी उभारुन त्यामधून जलवायू बदलांवर काम करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण एडीबीने दिले आहे. 10 देशांनी एकत्र येऊन निधीसंबंधीत प्लॅटफॉर्म स्थापन केला आहे.









