प्रतिनिधी/ खंडाळा
पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून खंडाळा येथील आसिफ गुलाब शेख (वय 23) या तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित अक्षय सुनिल मोहिते (वय 22 रा. अजनुज), अमित चव्हाण रा. दूध डेअरी जवळ यासही अटक केली असल्याचे सांगण्यात आले.
रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पारगांव- खंडाळा एसटी डेपो समोर ही घटना घडली. आसिफ शेख याचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय अक्षय मोहिते यास होता. याच कारणातून दोघांच्यात वादावादी, शिवीगाळ झाली. रागाच्या भरात संशयित अक्षय मोहिते याने आसिफ शेख याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. छाती, बरगडय़ा व मांडीवर वार झाल्याने मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच खंडाळ्याच्या पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार यांनी आपल्या सहकाऱयांसमवेत घटनास्थळी भेट दिली. शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे, डीवायएसपी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. पोलिसांनी रात्रीच संशयित आरोपी अक्षय मोहिते यास अटक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार करीत आहेत.








