विशाल कदम / सातारा
जिकडे पहावे कोरोनाच कोरोना असे भयानक चित्र सध्या निर्माण झाले आहे.साधा सर्दी, खोकला, ताप असला तरीही कोणी डॉक्टर ओपीडीत घेईना.उपचारासाठी कोरोनाचीच नियमावली लावली जात आहे.काहींना तर कोरोनाच्या भीतीने फोबिया जडला गेला आहे.खाजगी डॉक्टरांच्या ओपीडी जरी जिल्हाधिकारी यांनी सुरू ठेवण्याचे आदेश दिले गेले असले तरीही 90 टक्के खाजगी ओपीडी बंद आहेत.कोरोनाच्या काळात सातारकर नागरिकांच्या आरोग्याच्या सेवेसाठी शहरातील होमिओपॅथी डॉक्टरांनी एकत्र येऊन मोफत तपासणी व उपचार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी केवळ 11 ते 2 ही वेळ डॉ. हनिमन होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये उद्यापासून सुरू होत आहे, अशी माहिती हॉस्पिटलच्या संचालकांनी दिली.
कोरोनाच्या संकटामुळे जिह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील खाजगी डॉक्टरांची ओपीडी क्लिनिक 90 टक्के बंदच आहेत.जे चालवतात ते माणुसकीच्या भावनेतून धाडस घेऊन चालवत आहेत.कोरोनाच्या दहशतीमुळे किरकोळ आजार असणाया रुग्णांना आपला त्रास अंगावरच काढावा लागत आहे.प्रसंगी त्यातच काहींचे दुखणं बळवून जीवावर बेतले जाण्याची भीती असते.असे खाजगी डॉक्टरांच्या ओपीडी ग्रामीण भागात बंदच दिसतील. त्यामुळे किरकोळ सर्दी, खोकला हे जरी आले तरी कोरोना आला अशी भीती सर्वसामान्यामध्ये निर्माण होऊ लागली आहे.त्याकरता सरकारी आरोग्य केंद्रात जावे लागते.खाजगीत गेले तरीही कोरोनाची भीती दाखवून पैसे उकळण्याचे प्रकार ऐकायला मिळत आहेत.अनेकांना कोरोनामुळे मानसिक ताण येतो तर वेगवेगळ्या व्याधी जडल्या जातात.कोरोनाच्या संकटकाळात पुढे येऊन वैधकीय तपासणी मोफत करण्यासाठी आणि मोफत उपचार करण्यासाठी होमिओपॅथी चळवळ पुढे आली आहे.
याच चळवळीतील डॉक्टरांनी गतवर्षी बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात डॉ. हनिमन होमिओपॅथिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सुरू केले आहे.त्याच हॉस्पिटलमध्ये दि.21पासून सकाळी 11 ते 2 या वेळेत मोफत सुविधा सुरू करण्यात येणार आहे.यामध्ये सेवा देण्यासाठी संचालक मंडळाचे डॉ. राहुल शिरकांडे, डॉ. अभिजित कुचेकर, डॉ. अभिजित गुरव, डॉ. जवाहरलाल शाह, डॉ. सुखदेव आपटे, डॉ. अभयसिंह चव्हाण, डॉ. सिद्धार्थ माने,डॉ. प्रवीण भिलारे हे तयार आहेत.
कोरोनाचे संकट जाई पर्यन्त सुविधा सुरू राहणार
सातारा शहर व जिह्यातील रुग्णांना सेवा देण्यासाठी होमिओपॅथी डॉक्टरांनी निर्णय घेतला आहे.सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी आणि उपचार होमिओपॅथी औषधें वापरून केले जाणार आहेत.सध्या कोरोनामुळे सर्वसामान्य माणसांचे मानसिक व आर्थिक स्थैर्य कमकुवत झाले आहे. त्यामुळे दैनंदिन गरजा भागवताना त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. होमिओपॅथी औषधे शारीरिक व मानसिक स्थैर्य सुधारण्यास नक्कीच मदत करतात. ही सवलत कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत राहील, असे डॉ.अभिजित गुरव यांनी सांगितले.








