अखेर रमेश धुरी यांचे आत्मदहन आंदोलन टळले : शासनाला दिली दोन महिन्यांची मुदत : आमदार नाईक यांनी स्वीकारली जबाबदारी
प्रतिनिधी / मालवण:
जिल्हय़ातील गिलनेट व रापणधारक मच्छीमारांची मत्स्य दुष्काळाच्या संकटातून मुक्तता व्हावी म्हणून आत्मदहन आंदोलनाचे अस्त्र उपसणारे ज्येष्ठ मच्छीमार नेते रमेश धुरी यांनी आपले आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. आमदार वैभव नाईक व मत्स्य अधिकाऱयांच्या उपस्थितीत त्यांनी ही घोषणा करत आपल्या 18 मागण्यांचे निवेदन सादर केले. आता शासनाकडून या मागण्यांना कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे पारंपरिक मच्छीमारांचे लक्ष लागून राहिले आहे.
11 फेब्रुवारी रोजी दांडी समुद्र किनारी झालेल्या मत्स्य दुष्काळ परिषदेत आमदार नाईक व मत्स्य अधिकाऱयांच्या उपस्थितीत धुरी यांनी आपल्या वाढदिनी आत्मदहन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. आज नाईक यांनी धुरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. नाईक म्हणाले, प्रश्न मार्गी लागत नाहीत म्हणून वयाच्या 77 व्या वर्षी धुरींना आंदोलन करावे लागते ही शासन म्हणून आमच्यासाठी खेदाची बाब आहे. शासन याप्रश्नी कुठे कमी पडत असेल, तर त्यादृष्टीने नक्की सुधारणा केल्या जातील. मात्र, मत्स्य विभागाच्या अधिकाऱयांनी आपल्या अधिकारांचा जास्तीत जास्त उपयोग पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळवून देण्यासाठी करायला हवा. पारंपरिक मच्छीमारांच्या तक्रारी येणार नाहीत, याची खबरदारी घ्यायला हवी. किनाऱयावरून एलईडी नौका दिसत असतील आणि त्या तुम्हाला पकडता येत नसतील, तर पारंपरिक मच्छीमारांचा रोष स्वाभाविकच आहे. कोरोना पार्श्वभूमीवर शिथीलता प्राप्त झाल्यावर धुरी यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक घेऊन मच्छीमारांचे प्रश्न मार्गी लावू, असे नाईक म्हणाले.
18 मागण्यांचे निवेदन सादर
नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जि. प. सदस्य हरी खोबरेकर, मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर, परवाना अधिकारी मुरारी भालेकर, बबन शिंदे, बाबी जोगी, किसन मांजरेकर, मालवण तालुका श्रमिक मच्छीमार संघाचे अध्यक्ष छोटू सावजी, रापण संघटनेचे सचिव दिलीप घारे, मत्स्य अभ्यासक महेंद्र पराडकर, मिथुन मालंडकर, भाऊ मोरजे आदी उपस्थित होते. धुरी यांनी एलईडी मासेमारी बंदीची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सना रोखावे. क्यार वादळग्रस्त मच्छीमारांना शासनाने मदतनिधी द्यावा. मासेमारी बंदी कालावधीत पारंपरिक मच्छीमारांना अनुदान मिळावे, अशा विविध 18 मागण्यांचे निवेदन आमदारांना सादर केले.
मच्छीमार फेडरेशनकडून पाठिंबा
दरम्यान, जिल्हा मच्छीमार सहकारी संस्था फेडरेशन अध्यक्ष मेघनाद धुरी यांच्या नेतृत्वाखाली मच्छीमार संस्थांच्या पदाधिकाऱयांनी ज्येष्ठ मच्छीमार नेते रमेश धुरी यांच्याशी चर्चा केली. गंगाराम आडकर, सुधीर जोशी, रमेश मेस्त, विकी चोपडेकर, डेनिस नरोन्हा, सदानंद सारंग आदी उपस्थित होते. आचरा येथील मच्छीमार कार्यकर्त्या आकांक्षा कांदळगावकर यांनीही धुरी यांची भेट घेतली.









