झरेबांबर येथून पनवेलला रवाना : जिल्हय़ातील पहिलाच प्रयोग
वार्ताहर / दोडामार्ग:
दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर येथून थेट मुंबईपर्यंत प्रथमच बांबू वाहतूक सुरू झाली आहे. वेंगुर्ले आगाराच्या मालवाहतूक बसमधून ते रवाना करण्यात आले. जिह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. ‘कोरोना’ विषाणूच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे सर्व जिह्यांच्या सीमा लॉक करण्यात आल्या आहेत. साहजिकच त्यामुळे जिह्याबाहेरील वाहतूक थांबली आहे. अनेक ठिकाणी वाहतूक बंदीदेखील असल्याने व्यापार-उद्योग क्षेत्रासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासन पातळीवरून येन-केनप्रकारे वाहतूक सुरू करून छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामध्ये एसटी प्रशासन हळूहळू पावले टाकत आहे. दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबार येथे एसटीतर्फे असाच एक अभिनव प्रयत्न करण्यात आला. झरेबांबर येथील बांबू एसटीच्या मालवाहक गाडीतून मुंबईला पाठविण्यात आले. दोडामार्ग तालुक्यातील बहुतांश गावात बांबूची मोठय़ा प्रमाणात लागवड झालेली आहे. बांबूचा मोठा व्यवसाय तालुक्यात चालतो. लॉकडाऊनमुळे गेल्या दोन-तीन महिन्यात हा व्यवसाय पूर्णपणे थांबला होता. मात्र, सोमवारी एसटीच्या मालवाहक गाडीतून बांबूची वाहतूक झाली. सदर बांबू नेण्यासाठी वेंगुर्ले आगाराची मालवाहतूक बस झरेबांबरमध्ये दाखल झाली होती. या बसची मागणी येथील प्रसिद्ध बांबू व्यावसायिक विवेक केसरकर यांनी केली होती. मुंबई-पनवेल पर्यंत हे बांबू नेण्याची परवानगी त्यांना मिळाली होती. या बसमधून बांबू पाठवताना आगारप्रमुख नीलेश वारंग, लिपिक विक्रांत पाटील व वाहक बबन तळणकर आदी उपस्थित होते.









