World Heritage Week :सौरभ मुजुमदार,कोल्हापूर
पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय येथे कोल्हापूर हे कलापुरच होते. हा संदेश जगभर पोहोचिवणारे एक अमूल्य स्वतंत्र दालन आहे ते म्हणजे कोल्हापुरातीलच कलावंतांच्या सहकार्याने इ.स. 1953 मध्ये सुरू झालेले चित्रकलाकृती दालन. सध्या या चित्रदालनात निवडक 21 चित्रे तर यातीलच उपदालनात व्यक्तीचित्र दालन म्हणून 25 कलाकृती आहेत. संपूर्ण देशभर गाजलेल्या या कलाकृती उदयोन्मुख कलाकारांना आजही नवीन प्रेरणा देतात.
राजर्षी शाहू महाराजांनी ज्या चित्रकारांना दरबारी चित्रकार म्हणून सन्मान दिला ज्यांच्या कलाकृतीतून कोल्हापूरचा इतिहासच डोळ्यासमोर उभा राहतो. ते चित्रकार आबालाल रहिमान होय. शेतीसोबत संस्थानात कारकून म्हणून सेवा करणाऱ्या आबालाल यांचे वडील कुराणच्या हस्तलिखित प्रती तयार करीत त्याच पानाभोवती लहानपणापासून आबालाल आकर्षक नक्षीकामाचे काम करीत. इ.स. 1888 मध्ये व्हाईसरॉय पदक मिळालेल्या आबालाल रहमान यांच्या घोडा,लाल फेटावाला,फळे,माकडवाला,तान्हुल बाळ अशी विविध चित्रे या दालनात असून तत्कालीन पंचगंगेचा सुंदर व सुस्थितीतील दगडी घाट व ब्रह्मपुरी टेकडी परिसर त्यांचे हे चित्र अभ्यासकांना अत्यंत उपयुक्त आहे.
चित्रपट सृष्टीतील नामवंत निर्माते कला महर्षी बाबुराव पेंटर यांची कारकीर्द इ.स. 1890 ते 1954 या काळातील त्यांच्या कलाकृतींना या दालनात मानाचे स्थान आहे.मंदिर परिसरातून पूजेसाठी निघालेली एक स्त्राr हे त्यांचे तैलरंग चित्र प्रत्यक्ष छायाचित्रकारानेच टिपलेले आहे असेच वाटते.एका महान चित्रकाराला पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यांचेच एक मोठे तैलचित्र बनवून देण्याचे होते त्यासाठी नेहरूंचे एक लहान चित्रच त्यांनी सर्वप्रथम आपल्या कुंचल्यातून साकारले तेच मूळ चित्र या दालनात आजही असून ते चित्रकार यांच्या याच चित्रातून इतिहासाचा अनमोल ठेवा सुरक्षित आहे ते म्हणजे बाबा गजबर होय.कोल्हापूरच्या मातीत चित्रकलाकृतीक्षेत्रात आणखीन एक हिरा सापडला तो म्हणजे माधव विश्वनाथ धुरंदर.ज्यांच्या कलाक्षेत्रातील महनीय योगदानाबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना रावबहाद्दूर या पदवीने सन्मानित केले.त्यांचे रंकाळा तलावाचे चित्र या दालनात आहे भाई माधवराव बागल,गणपतराव वडणगेकर, के.वी. गुळवणींचे पन्हाळा जलरंग चित्र.विविध कलाकृतींचा अमूल्य खजिनाच या चित्रदालनात आहे.वडणगेकर यांनी रेखाटलेले मिचेल यांचे इ.स. 1946 चे व्यक्तिचित्र पाहिल्यास क्षणभर प्रत्यक्ष समोर वुलनचे वस्त्र चिकटवल्याचा भास होतो.रवींद्र मिस्त्री, निसर्ग चित्रकार एस. ए. एम. काझी, दत्तोबा दळवी, विलास बकरे, दिलीप जामदार, चंद्रकांत मांडरे या महान कलाकारांच्या कलाकृती प्रत्यक्ष जवळून पाहण्याची ही संधी अमूल्यच आहे.
भव्य दिव्य तैलरंग चित्रे
वस्तू संग्रहालयाच्या मुख्य दालनात निवडक अशी साधारण सात फूट उंच तर पाच फूट रुंद या आकाराची पाच भव्य दिव्य तैलरंग चित्रे आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, श्रीमंत शिवाजी (तिसरे) महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांचा त्यात समावेश आहे.
अँडरसन यांचे एकमेव दुर्मिळ चित्र
कोल्हापूरचा चेहरा मोहरा बदलण्याची सुरुवात पोलिटिकल एजंट कर्नल अँडरसन यांनी केली. अवघ्या नऊ वर्षात कोल्हापूरची आर्थिक घडी व्यवस्थित करून दरबारचे उत्पन्न दुप्पट करून दाखविण्याची किमया त्यांनीच केली. या वाढलेल्या उत्पन्नातूनच चालू केलेल्या लोकोपयोगी कर्तव्यातून त्यांची लोकप्रियता वाढतच गेली. राजाराम हायस्कूल, टाऊन हॉल ही त्यांच्याच दूरदर्शीपणाची जिवंत उदाहरणे होत. त्यांच्या कल्पनेतून छत्रपती राजाराम महाराज यांचा परदेश दौरा यशस्वी झाला. कोल्हापूर सोडल्यावर त्यांना आर्थिक मदत व्हावी या हेतूने कोल्हापूरच्या नागरिकांनी अंडरसन मेमोरियल ट्रस्ट इ.स.1876 ला स्थापन केला होता. करवीर छत्रपतींनी त्यांचा उल्लेख दयाळू व अनुभवी तसेच मित्र व मार्गदर्शक असा केलेला कागदपत्रात आढळतो. साता समुद्रापारहून आलेल्या परदेशी अधिकाऱ्या च्या लोकप्रियतेचे प्रतीक असणारे एकमेव तैलरंग चित्र प्रतिमा आज केवळ याच संग्रहालयात पहावयास सापडते.अगदी इंग्लंडमध्ये देखील त्यांचे एकही छायाचित्र सध्या उपलब्ध नाही.
भारत महारूगडे, इतिहास संशोधक व कोल्हापूर अभ्यासक
जागतिक वारसा सप्ताह-अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
दाट वृक्षांच्या सावलीत आजही इतिहासाची साक्ष देतेय कोल्हापुरातील ‘ही’ वास्तू
World Heritage Week : जागतिक वारसा जपणारे कोल्हापूर वस्तुसंग्रहालय
World Heritage Week : सातवाहनकालीन कोल्हापूरचा इतिहास
Previous Articleचक्क मृतदेह रस्त्यावर ठेवून चक्काजाम आंदोलन
Next Article मच्छे येथील 220 केव्ही स्टेशनसाठी लवकरच निविदा









