नणदीवाडी येथील घटना
वार्ताहर /एकसंबा
नणदीवाडी (ता. चिकोडी) येथे स्मशानभूमीस जाण्यास असलेल्या रस्त्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सोमवार 21 रोजी ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. चक्क मृतदेहच आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठेवून जवळपास दोन तास रस्ता अडवून धरला. घटनास्थळी तहसीलदार, पीएसआय, सीपीआयनी दाखल होऊन समस्या जाणून घेऊन चर्चेद्वारे तात्पुरती समस्या सोडविण्यात आली. सदर रस्त्याच्या जागेचा वाद न्यायालयात असून न्यायालयाच्या निर्णयानंतर सदर समस्येवर पडदा पडणार असल्याचे एकंदरीत चित्र दिसून आले.
नणदीवाडी येथील रहिवासी सुधाकर महादेव नाईक (वय 52) यांचे सोमवार 21 रोजी निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीस जाणारा रस्ता खासगी असल्याने एकसंबे कुटुंबीयांनी काटेरी झाडे टाकून बंद केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून नणदीवाडी येथील सर्व्हे नंबर 81 मध्ये स्मशानभूमी आहे. सदर स्मशानभूमीस जाण्यासाठी एकसंबे यांच्या मालकीच्या सर्व्हे नंबर 82 मधून पायवाट होती. गेल्या अनेक वर्षांपासून या पायवाटेद्वारे अंत्ययात्रा स्मशानभूमीत नेली जाते. पण सर्व्हे नंबर 82 मधून जाणारी पायवाट एकसंबे यांच्या मालकीची जागा असून काही दिवसांपूर्वी स्मशानभूमीस जाणारा रस्ता बंद केला होता.









