जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केल्या सूचना, सुवर्णसौधमध्ये कार्यशाळा
प्रतिनिधी/ बेळगाव
विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई होऊ नये, प्रत्येकाने अत्यंत सावधगिरीने आणि निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार काम करावे, निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यासाठी निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी आणि इतर पथकांची नियुक्ती करून कामाला लागा, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे.
सुवर्णसौधच्या सभागृहामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांबरोबरच नोडल अधिकारी, विभागीय अधिकारी व विविध मतदारसंघांतील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण शाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ही सूचना केली आहे. बेळगाव जिल्हा हा महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर वसलेला आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यातून अवैधरीत्या दारू, रक्कम येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चेकपोस्टवर अत्यंत सावधगिरीने काम करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
भरारी पथक, व्हिडिओ व्ह्यूईंग टिम, सर्व्हिलन्स टिम यासह इतर पथकांनी त्यावर अधिक लक्ष द्यावे. आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी कठोर कारवाई करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. 24 तास आता प्रत्येकाला काम करावे लागणार आहे. त्यामुळे तीन शिफ्टमध्ये या टिम्स तैनात केल्या जातील. कोणत्याही ठिकाणी माहिती मिळाल्यास तातडीने घटनास्थळी धाव घेऊन व्हिडिओ रेकॉर्डिंगबरोबरच संबंधितांवर योग्य प्रकारे गुन्हा दाखल करावा, असे सांगण्यात आले.
निवडणुकीच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या पथकाला आवश्यक ती साधनसामग्री वेळेत पोहोचविली जाईल. कोणत्याही प्रकारची मोठी रक्कम किंवा मौल्यवान वस्तू जप्त केल्यानंतर त्याची माहिती वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावी. त्यानंतर वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई करावी, असेही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
कर्तव्यात कसूर केल्यास कठोर कारवाई
निवडणूक काळात कर्तव्यात कसूर केल्यास कठोर कारवाई केली जाईल. तेव्हा प्रत्येकाने नि:पक्षपातीपणे कामे पार पाडावे, असे सांगण्यात आले. जबाबदारी ओळखून कोणताही गोंधळ होऊ न देता काम केले पाहिजे. जर निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही घटना सांगावी, असेही यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
23 हजारहून अधिक कर्मचारी कार्यरत
विधानसभा निवडणुकीसाठी 23 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी, विभागीय अधिकारी आणि विविध पथकांमध्ये त्यांची नेमणूक केली जाणार आहे. त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना सांगण्यात येणार आहेत. त्यानुसार त्यांनी काम करायचे आहे. तेव्हा आता जे प्रशिक्षण दिले जात आहे, ते प्रशिक्षण अत्यंत काळजीपूर्वक पूर्ण करावे आणि निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार काम करावे, असे त्यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधी किंवा राजकीय नेत्याच्या गाठीभेटी घेणे टाळा, नाहक कोणाचीही अधिक भेट घेण्याचा प्रयत्न करू नका. सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनीही तैनात करण्यात येणाऱ्या पथकांबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी विविध कायद्यांबाबत माहितीदेखील दिली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी भेटवस्तू, साड्या, घरगुती उपकरणे यासह रक्कम देऊन प्रलोभने दाखविली जात आहेत. तेव्हा त्या संपूर्ण वस्तू जप्त करण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील म्हणाले, निवडणूक कर्तव्यात व्यस्त असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ओळखपत्रे परिधान करावीत. आंतरराज्य तसेच आंतरजिल्हा तपासणी नाके स्थापन करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करणे महत्त्वाचे आहे.









