27 विद्यार्थ्यांना पीएचडी तर 11 जणांना सुवर्ण : पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापीठाचा 11 वा पदवीदान समारंभ सोमवार दि. 20 रोजी होणार आहे. सकाळी 11 वाजता हलगा येथील सुवर्ण विधानसौधच्या सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमाला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, उच्चशिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण, बेंगळूर येथील उच्चशिक्षण कौन्सिलचे उपचेअरमन प्रा. बी. तिम्मेगौडा उपस्थित राहणार असल्याची माहिती कुलगुरु प्रा. एम. रामचंद्रगौडा यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावर्षी एकूण तिघा जणांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सामाजिक क्षेत्रात माजी खासदार कै. सुरेश अंगडी यांना मरणोत्तर डॉक्टरेट दिली जाणार आहे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात एम. के. श्रीधर तर साहित्य क्षेत्रात प्रा. मल्लेपूरम जी. वेंकटेश यांना दिली जाणार आहे. यावर्षी एकूण 27 विद्यार्थ्यांना पीएचडी दिली जाणार आहे. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील 149 विद्यार्थ्यांची रँकिंगमध्ये निवड झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
11 विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. केएलएसची विद्यार्थिनी श्वेता पाटील, जमखंडी येथील श्रीदेवी अरकेरी, बागलकोट येथील शशिकला निगरी, आरसीयू कॅम्पसमधील लक्ष्मी मगदूम, बागलकोट येथील गुरम्मा बलगेर, प्रियांका मगदूम, मुस्कान मुल्ला, सविता कोलेण्णावर, क्रांती पुजारी, पूजा परसण्णावर यांनी सुवर्ण पदकांवर आपली मोहर उमटवली आहे. शशिकला निगरी हिला 3 सुवर्ण पदके मिळाली असल्याचे कुलगुरुंनी सांगितले.
भुतरामहट्टी येथील कॅम्पस अपुरा पडत असल्यामुळे हिरेबागेवाडी येथे नवीन कॅम्पसची उभारणी केली जात आहे. यासाठी उभारण्यात येणारी संरक्षक भिंत बांधण्याचे काम पूर्ण झाले असून, पुढील कामाला लवकरच सुरुवात होईल, असे सांगण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या रजिस्टार राजश्री जैनापुरे, मूल्यमापन विभागाचे रजिस्ट्रार शिवानंद गोरनाळे, महसूल अधिकारी प्रा. एस. बी. आकाश, प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यासह इतर उपस्थित होते.









