लवकरच नवीन शिधापत्रिकांना वितरण, राज्य सरकारचा आदेश
बेळगाव : नवीन रेशनकार्डसाठी हजारोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे रेशनकार्डचे वितरण कधी होणार? या प्रतीक्षेत लाभार्थी आहेत. दरम्यान पुढील 15 दिवसांत नव्या रेशनकार्डचे वितरण करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्यामुळे रेशनकार्डची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. शिवाय लाभार्थ्यांच्या हातात नवीन रेशनकार्ड मिळणार आहे. मागील दोन वर्षांपासून नवीन रेशनकार्डचे काम विस्कळीत झाले आहे. मध्यंतरी काहीकाळ नवीन रेशनकार्डचे वितरण झाले होते. मात्र त्यानंतर नवीन रेशनकार्डचे काम पूर्णपणे थांबले आहे. शिवाय नवीन रेशनकार्डसाठी अर्जस्वीकृतीही थांबली आहे. परिणामी विविध शासकीय योजनांपासून लाभार्थ्यांना वंचित रहावे लागले आहे. राज्य सरकारने यापूर्वीही दोनवेळा रेशनकार्ड तातडीने वितरीत करा, असा आदेश दिला होता. मात्र त्यानंतर याची अंमलबजावणी केवळ काही तासच होऊ लागली आहे. तांत्रिक अडचणींमुळे वितरणाचे काम स्थगित केले जात आहे. त्यामुळे हजारो लाभार्थ्यांना रेशनकार्डपासून वंचित रहावे लागले आहे.अन्नभाग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्रतिकिलो 34 रुपयांप्रमाणे निधी वितरीत केला जात आहे. सरकारने निवडणुकी दरम्यान 10 किलो तांदुळ देण्याची घोषणा केली होती. मात्र राज्य सरकारकडे पुरेसा तांदुळसाठा नसल्याने तांदळाच्या ऐवजी रक्कम दिली जात आहे. सद्यस्थितीत माणसी 5 किलो तांदळाचा मोफत पुरवठा केला जात आहे. मात्र अद्यापही बरेच लाभार्थ्यांकडे रेशनकार्ड नसल्याने अन्नभाग्यपासून वंचित रहावे लागत आहे. काँग्रेस सरकारने सत्तेत आल्यानंतर अन्नभाग्य योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. तेंव्हापासून रेशनकार्डच्या मागणीत दुप्पटीने वाढ झाली आहे. रेशनकार्डसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. विशेषत: गतवर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना अद्याप रेशनकार्डे मिळाली नाहीत. त्यामुळे गतवर्षी अर्ज केलेल्यांना प्रथम प्राधान्य देण्याची शक्यता आहे.
गतवर्षी अर्ज केलेल्यांना प्रथम प्राधान्य
राज्य सरकारकडून येत्या 15 दिवसांत नव्या रेशनकार्डचे वितरण करा, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. विशेषत: गतवर्षी अर्ज केलेल्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. बीपीएल, एपीएल, नवीन रेशनकार्डसाठी हजारोंनी अर्ज दाखल झाले आहेत.
– श्रीशैल कंकणवाडी-सहसंचालक अन्न व नागरी पुरवठा खाते









