वृत्तसंस्था/ लंडन
भारतात 2024 साली होणाऱ्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला दुखापती समस्येमुळे तसेच अति ताणामुळे सहभागी न होण्याची सूचना इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने दिल्याचे एका विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात आले आहे.
अलिकडच्या कालावधीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज आर्चरला वारंवार दुखापतीमुळे अनेक स्पर्धांना मुकावे लागले. 2022 च्या आयपीएल हंगामासाठी मुंबई इंडियन्सने आर्चरला 8 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले होते. दरम्यान मुंबई इंडियन्सच्या फ्रांचाईजीने गेल्याच आठवड्यात आर्चरला आपल्या संघातून सुटका केली आहे. 2024 च्या आयपीएल स्पर्धेसाठी क्रिकेटपटूंचा लिलाव 19 डिसेंबरला दुबईत होणार आहे. मुंबई इंडियन्सने या लिलावासाठी तयार करण्यात आलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये आर्चरचा समावेश केला नसल्याचे सांगण्यात आले. गेल्या मे महिन्यात मुंबई इंडियन्सकडून आयपीएल स्पर्धेत खेळताना आर्चरला कोपरा दुखापत झाली होती. ही दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. गेल्या मे महिन्यापासून आर्चरने व्यावसायिक क्रिकेटपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्याने त्याला भारतात झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला मुकावे लागले होते. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाकडून आर्चरची ही दुखापत लवकर बरी होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याला आयपीएल स्पर्धेत सहभागी न होण्याचा सल्ला मंडळाकडून मिळाल्याचे समजते. पुढील वर्षीच्या 4 जूनपासून सुरु होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने आर्चर बरोबर दोन वर्षांच्या कालावधीसाठी नवा मध्यवर्ती करार केल्याचे सांगण्यात आले.









