‘बाजार’ ही आपल्या नेहमीच्या परिचयाची जागा आहे. धान्यबाजार, भाजीबाजार, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा बाजार, औषधांचा बाजार अशा अनेक प्रकारच्या बाजारांमध्ये आपल्याला जावे लागते. पण ज्या ठिकाणी वधू विकत मिळतात असाही एक बाजार या जगाच्या पाठीवर आहे, हे जाणून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. बुल्गारिया देशात ‘स्मारा जागोर’ नामक एक स्थान आहे, तेथे अशा प्रकारचा वधूंचा बाजार भरतो, जेथून आपल्या पसंतीची वधू पुरुष खरेदी करु शकतात. पूर्वीच्या काळी स्त्री-पुरुष गुलामांचे बाजार भरविले जात. तशाच प्रकारे पण काहीशा वेगळ्या पद्धतीचा हा बाजार आहे.

या बाजारात लग्नाच्या वयाच्या मुलींची बोली त्यांचे पालक किंवा मातापिताच लावतात. यास्थानी इच्छुक वर आपल्या कुटुंबासह जातात आणि बाजारातील मुली पाहतात. पसंत पडलेली मुलगी वधू म्हणून सांगितली जाईल त्या किमतीला खरेदी करतात आणि तिला घेऊन येऊन तिच्याशी विवाह करतात. वधूची खरेदी करताना तिची परीक्षाही घेण्याचा अधिकार खरेदीदाराला असतो. मात्र, या बाजारातून खरेदी झालेल्या महिलेला त्या पुरुषाने पत्नीचा दर्जा दिलाच पाहिजे असा नियम आहे. अनेकांनी या बाजारावर आजवर आक्षेप घेतलेले आहेत. मात्र, आजही तो पूर्वीच्याच पद्धतीने सुरु असून लोकप्रियही असल्याचे सांगितले जाते.









