महापालिका आयुक्तांची जय किसान भाजी मार्केटला नोटीस : सात दिवसांत म्हणणे मांडण्याची सूचना
बेळगाव : जय किसान भाजी मार्केटचा लँड युज बदल आपोआप रद्द झाल्याचा आदेश बुडा आयुक्तांनी जारी केला आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडून देण्यात आलेला बांधकाम परवाना व पूर्णत्व प्रमाणपत्र का रद्द करण्यात येऊ नये? याबाबत नोटीस मिळालेल्या सात दिवसांत लेखी स्वरुपात म्हणणे मांडण्याची नोटीस जय किसान भाजी मार्केटला मनपा आयुक्त शुभा बी. यांनी बजावली आहे. सोमनाथनगर येथील जय किसान भाजी मार्केटचा लँड युज बदल करताना काही अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र त्या अटींचे उल्लंघन झाल्याने लँड युज बदल आदेश रद्द करण्यात आल्याचा आदेश बुडा आयुक्तांनी जारी केला आहे. त्यापाठोपाठ कृषी पणन संचालकांनीही व्यवसाय परवाना रद्द केला आहे. त्यातच आता मनपा आयुक्तांनीही जय किसान भाजी मार्केटला नोटीस जारी केली आहे.
कर्नाटक राज्य रयत संघ, हसीरू सेने बेळगाव यांच्यातर्फे सदर सर्व्हे नंबरमधील सर्व गाळे अनधिकृत ठरले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने दिलेला बांधकाम परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यानुसार केएमसी अॅक्ट कलम 443(4) नुसार बांधकाम परवाना व पूर्णत्व प्रमाणपत्र का रद्द करण्यात येऊ नये? अशी नोटीस मनपा आयुक्तांनी 17 सप्टेंबर रोजी जय किसान भाजी मार्केटला जारी केली आहे. नोटीस मिळालेल्या सात दिवसांच्या आत लेखी स्वरुपात म्हणणे मांडण्यात यावे, अन्यथा आपले म्हणणे काही नाही असे गृहित धरून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नोटिसीत म्हटले आहे.









