अटकेतील संशयितांची संख्या चारवर
बेळगाव : मंगळवार पेठ, टिळकवाडी येथे आठ दिवसांपूर्वी झालेल्या महिलेच्या खून प्रकरणी आणखी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. टिळकवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या चारवर पोहोचली आहे. गेल्या बुधवार दि. 10 सप्टेंबर रोजी सकाळी गीता रणजित दावले ऊर्फ गवळी (वय 45) राहणार गवळी गल्ली, मंगळवार पेठ, टिळकवाडी या महिलेचा जांबियाने वार करून भीषण खून करण्यात आला होता. याप्रकरणी गीताचा दीर गणेश लक्ष्मण दावले ऊर्फ गवळी (वय 60) याला त्याच दिवशी पोलिसांनी अटक केली होती.
खून झालेल्या गीताला न्याय द्यावा, या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आले होते. त्यानंतर खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या प्रमुख आरोपी गणेशची पत्नी व मुलांना गुरुवारी अटक केली आहे. यश गणेश दावले ऊर्फ गवळी (वय 25), आदित्य गणेश दावले ऊर्फ गवळी (वय 20), सविता गणेश दावले ऊर्फ गवळी (वय 48) सर्व राहणार गवळी गल्ली, मंगळवार पेठ, टिळकवाडी यांना गुरुवारी दुपारी अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. गीताच्या खुनाच्या आदल्यादिवशी रात्री हे सर्वजण परगावी गेले होते. त्यांनाही खुनाची माहिती होती, असे समजते.









