त्या दिवशी प्रज्ञा आली ती अगदी सैरभैर झाल्यासारखीच. खूप अस्वस्थ. तिला काहीच सुचत नव्हते. ‘काय गं? काय झालं?’
प्रज्ञा-‘खूप टेन्शन आलंय गं. मिताली दहावीला आहे ना. परीक्षा अगदी जवळ आली आहे. इतके दिवस ठीक होतं गं सगळं! पण अलीकडे ती ‘भीती वाटते, धडधडतंय’ असं काहीबाही बोलत असते. अगं परवा तर, ‘आई मला पेपर लिहायला जमेल ना गं?’ असं म्हणून रडायला लागली. वर्षभर पोरीने मेहनत केली आहे आणि आता असं झालं तर व्हायचं कसं? मला काय करावं सुचेना. तू बोलशील का तिच्याजवळ?’
हो. नक्की बोलेन. काळजी करू नको. होईल सारं ठीक असे आश्वस्त करत मितालीला नंतर बोलावून घेतले. ‘मावशी मला खूप भीती वाटते गं. काय करू सुचत नाही. वर्षभर सतत क्लास, अभ्यास, सतत धावपळ हे सगळं केलंय. मेहनतही खूप घेतली आहे परंतु परीक्षेच्या विचारानेच छातीत धडधडतंय.’ ‘हं..मी समजू शकते. बरं..मला सांग मितू, तुला अभ्यासाव्यतिरिक्त कशाची आवड आहे?’ ‘किती वेगळा प्रश्न विचारलास मावशी तू.’ मितालीचा मूड एकदमच बदलला. ती उत्साहात म्हणाली, ‘मला संगीत ऐकायला, गाणं म्हणायला फार आवडतंय. मी गाणे शिकते आहे.’ ‘अरे व्वा!!’
‘हो मावशी..पण’
‘पण..या वषी आईने क्लासच बंद केला. बाबाही म्हणाले, या वषी गाणे वगैरे काही नको. अभ्यासावरचा फोकस जातो. अभ्यासच करायचा.’
‘हं…मला सांग यावषी गाणे शिकता आले नाही तरी स्वतःसाठी दहा मिनिटे काढून गाणे म्हणू तर शकतेस? थोडा रियाज करू शकतेस. गाणे ऐकू शकतेस.’ ‘हो नक्की. खरंतर मलाही वाटतं हे करावं. पण तू आईला समजावून सांगशील का?’
‘अगं, जरा थोडं इकडे-तिकडे झालं तरी ओरडते ती. हल्ली तर मला स्पॉटलाईटखाली उभं असल्यासारखं वाटतं. सगळय़ांचं लक्ष माझ्यावरच. खरंतर मी प्रामाणिकपणे अभ्यास करते आहे. खूप पेपर सोडवून झाले, तीन तीन वेळा उजळणी झाली. आधी दोन वर्षे कोरोनामुळे कुठे जाणे येणे नाही आता दहावी म्हणून कुठे गेलो नाही. अभ्यास, अभ्यास नी अभ्यासच! आता ना, अभ्यासाला बसले की झोपच येते. सगळेच खूप दहावी-दहावी करतात गं. मग कधीतरी वाटतं की ही परीक्षा नक्कीच खूप अवघड असणार. अभ्यास करूनही समजा कमी गुण मिळाले तर? आईबाबा ओरडणार, नाराज होणार. मग त्या विचाराने रडूच येतं मला.’
‘हं..मीतू मला खरं खरं सांग हं. तुला परीक्षेला सामोरी जायची भीती वाटते आहे की समजा गुण कमी मिळाले तर आईबाबा ओरडणार याची?’
‘आईबाबा ओरडतील याचीच भीती वाटते. पेपर अवघड जाईल असं डोळय़ासमोर येतं, थेरमची स्वप्न पडतात..टेन्शन येतं.’
‘बरं. मी आईबाबा दोघांजवळही बोलेन. तू आजपासून सांगेन तसं मेडिटेशन करशील?’
‘हो,नक्की करेन.’
मितालीसोबत छान चर्चा झाली. सजगता ध्यानाचे तंत्र, व्हिज्युअलायझेशन, स्वयंसूचना यासारखी काही तंत्रे तिला आत्मसात करायला मदत केली. काही ऑडिओ करून दिले आणि मिताली घरी गेली.
मितालीच्या पालकांजवळ बोलणेही खूप गरजेचे होते. त्यांचा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सध्याचा ‘मार्क्सवाद..’ स्पर्धा, यामधे टिकून राहण्यासाठी अभ्यासासोबतच छंदाची जोपासना, बुद्धय़ांक वाढविण्यासाठी विविध गोष्टींची असलेली गरज अशा अनेक गोष्टींवर चर्चा झाली. नेमका गोंधळ कुठे आणि कसा होतो आहे, हे त्यांच्याही लक्षात आले. त्या दिवशी ते मितालीला दोन तास बाहेर फिरायला घेऊन गेले. तिच्यासोबत मोकळेपणाने गप्पा मारल्या, तू अभ्यास केला आहेस. तुझी मेहनत आम्ही पाहिली आहे. छान पेपर दे. रिझल्टचे टेन्शन घेऊ नको. आम्ही तुझ्या सोबत आहोत असा आश्वस्त करणारा संवाद झाला आणि खरोखरच जादूची कांडी फिरावी तसा मितूमधे दोनच दिवसात प्रज्ञाला फरक जाणवू लागला. मिताली आणि प्रज्ञासारखे विद्यार्थी आणि पालक यांची अनेक उदाहरणे समोर येत असतात.
आता दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. मुलांना आणि पालकांनाही कळत नकळत या परीक्षेचे दडपण, ताण आहेच. अर्थात ताण असणे हे स्वाभाविक आहे. गतीसाठी ताण चालना देतोही परंतु त्या ताणाचे प्रमाण किती असावे याबाबत प्रत्येकाने सजग रहायला हवे. उदाहरण देऊन सांगायचे तर ताण हा स्वयंपाकातील मीठाइतपतच हवा. म्हणजे पहा हं, एखाद्या पदार्थामध्ये प्रमाणापेक्षा मीठ अधिक झाले तर काय होईल? पदार्थ खारट होईल. मीठ अजिबातच नसेल तर तो पदार्थ बेचव लागेल. परंतु, त्या पदार्थामध्ये प्रमाणात मीठ असेल तर मात्र तो पदार्थ चविष्ट लागेल. तसेच ताणाचेही आहे. अजिबात ताण नसेल तर आपला प्रवास बेफिकिरीच्या दिशेने होण्याची शक्मयता अधिक असते आणि प्रमाणापेक्षा जास्त ताण आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्मयात आणू शकतो. म्हणून याचे भान प्रत्येकाने ठेवायला हवे. परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की प्रामाणिकपणे अभ्यास करणे ही गोष्ट आपल्या हातात असते, तेवढी आपण नीट करायची. यश-अपयश याचा जास्त विचार करून टेन्शन घ्यायचे नाही. पालकांनीही हे लक्षात घ्यायला हवे की दहावी हा एक टप्पा आहे. तो महत्त्वाचा आहे हे कुणी नाकारत नाहीच परंतु मुलांना ताण येईल आणि स्वतःलाही ताण येईल अशी दमछाक तर आपण करत नाही ना हे प्रामाणिकपणे तपासायला हवे. अभ्यासासोबतच इतर छंदांची जोपासनाही आवश्यक आहे.
या कालखंडामधे पालकांनी मुलांची पुरेशी झोप, आहार याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच अभ्यासाबाबत दुसऱयाशी तुलना टाळलेलीच उत्तम. प्रत्येकाची क्षमता, अभ्यासाची पद्धत, शिकण्याची पद्धत समजून घेण्याची पद्धतही वेगवेगळी असते याचे पालक म्हणून आपण भान राखणे गरजेचे आहे. मुले म्हणजे मातीचा गोळा, आकार द्याल तशी होणार हे म्हणायला ठीक आहे परंतु मूल हे मातीपेक्षा वेगळे सजीव, स्वतंत्र आणि सतत बदलणारे व्यक्तिमत्त्व घेऊन वाढत असते हे लक्षात घ्यायला हवे. तसेच नकळतपणे आपल्या इच्छा, आपली अपूर्ण राहिलेली स्वप्ने अपेक्षांच्या रूपात आपण त्यांच्यावर लादत नाही ना हेही तपासायला हवे.
तू वर्षभर अभ्यास केला आहेस. तुला निश्चित पेपर उत्तम जातील. अगदी शांतपणे परीक्षा दे. आम्ही तुझ्यासोबत आहोत हा आश्वासक भाव पालक म्हणून मुलांच्या मनात निर्माण करणे गरजेचे आहे. या कालखंडामधे मुलांवर लक्ष असू द्या परंतु सततच्या सूचना आणि त्यांना क्रीटिसाइज करणे टाळायला हवे. मुलांनीही अभ्यासाचे योग्य नियोजन आणि अभ्यासासोबतच दिवसाकाठी दहा मिनिटे काहीही न करता स्वस्थ बसून मनामधे डोकावून पाहण्याचे कौशल्य शिकणे, लक्ष देण्याचे कौशल्य अर्थात ध्यान/मेडिटेशन करणे आवश्यक आहे. दररोज झोपण्यापूर्वी स्वयंसूचनांच्या माध्यमातून शरीराचा प्रत्येक भाग शिथिल करत स्नायू शिथिल करणे, सकारात्मक सूचना देणे या तंत्रांचा अवलंब करायला हवा. परीक्षेच्यादृष्टीने व्हिज्युअलायझेशन हे तंत्रही उपयुक्त ठरू शकते.
त्यासाठी डोळे मिटून शांत बसायचे आणि आपले संपूर्ण लक्ष नैसर्गिक श्वसनाने होणारी छाती आणि पोटाची हालचाल जाणण्याकडे आणायचे. थोडे रिलॅक्स झाल्यानंतर अशी कल्पना करायची की आपण परीक्षेला निघालो आहोत. सर्व तयारी झाली आहे. कल्पनेने परीक्षा हॉल डोळय़ासमोर आणायचा. तिथले वातावरण, त्या त्या विषयांचे पेपर डोळय़ासमोर आणायचे. पेपर छान आहेत आणि आपण ते अतिशय सुरेख लिहितो आहोत, केलेले सारे आपल्याला व्यवस्थित आठवते आहे, पेपर व्यवस्थित पूर्ण झाला आहे. खूप छान रिलॅक्स वाटते आहे असे व्हिज्युअलाईझ करायचे. हे करत असताना ते दृश्य केवळ कोरडे दृश्य पाहतोय असे न पाहता त्यामधे उत्साहाच्या, आनंदाच्या, रिलॅक्स होण्याच्या भावना असायला हव्यात, तो जो अनुभव असतो तो अर्थात ते फील करणे असायला हवे.
आपल्या मेंदूतील उत्साहाची रसायने उत्तम राहण्यासाठी हे तंत्र मदत करेलच परंतु परीक्षेला सामोरे जाताना आपला आत्मविश्वास वाढायलाही याची निश्चित मदत होते. प्रत्येकाची अभ्यासाची एक वेगळी पद्धत असते. त्यानुसार परंतु शांतचित्ताने केलेला अभ्यास, योग्य आहार, पुरेशी झोप, मेडिटेशनची तंत्रे आणि आत्मविश्वास या सर्वांची सांगड घालत परीक्षा द्या. तुम्हाला यश लाभेल याबाबत शंकाच नाही. दहावीचा हा टप्पा आत्मविश्वासाने यशस्वीरीत्या निश्चित पार कराल. खूप खूप शुभेच्छा!
-ऍड. सुमेधा संजीव देसाई








