अहवालात पाकिस्तानवर ठपका ः भारताचे केले कौतुक
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या ब्यूरो ऑफ काउंटर टेररिजमच्या कंट्री रिपोर्ट्स ऑन टेररिजम 2021 नुसार भारत सरकारने दहशतवादी संघटनांच्या संचालनाचा शोध घेत त्यांना नष्ट करण्यासंबंधी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. तर दहशतवाद विरोधात ठोस पावले न उचलणाऱया पाकिस्तानवर अहवालात टीका केली आहे.
2021 मध्ये दहशतवादाने केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर, ईशान्येतील राज्ये तसेच मध्य भारतातील काही हिस्स्यांना प्रभावित केले आहे. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन, आयएसआयएस, अल-कायदा, जमात-उल-मुजाहिदीन आणि जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश हे भारतात सक्रीय असणारे दहशतवादी गट आहेत.
2021 मध्ये दहशतवाद्यांच्या रणनीतित बदल दिसून आला आहे. दहशतवाद्यांनी नागरिकांवर हल्ले आणि आयईडीच्या वापरावर भर दिला आहे. भारत दहशतवाद विरोधी चौकशीशी संबधित माहितीवर अमेरिकेच्या विनंतीला त्वरित प्रतिसाद देत असल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे.
पाकिस्तानला सुनावले
दहशतवाद रोखण्यासाठी सहकार्यात्मक प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेला असलेल्या धोक्यांबद्दल भारताकडून त्वरित कळविण्यात येते. 2021 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये 153 दहशतवादी झाले, या हल्ल्यांमध्ये 274 लोकांचा मृत्यू झाला, ज्यात 45 सुरक्षा कर्मचारी, 36 नागरिक आणि 193 दहशतवादी सामील होते असे अहवालात नमूद आहे. अमेरिकेने स्वतःच्या या अहवालात पाकिस्तानवर ताशेरे ओढले आहेत. पाकिस्तानने दहशतवादी गटांना संपविण्यासाठी पुरेशी कारवाई केली नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
पाकिस्तानने स्वतःच्या भूमीवर हक्कानी नेटवर्क, लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या दहशतवादी गटांना नष्ट करण्यासाठी पुरेशी कारवाई केलेली नाही. पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर विरोधात खटला चालविला तरीही दहशतवादी संघटनेच्या कारवाया सुरूच राहिल्याचे अहवालाद्वारे म्हटले गेले आहे.









