रस्ता बनला धोकादायक : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : वाहनधारकांतून संताप, त्वरित दुरुस्तीची मागणी
वार्ताहर /किणये
रणकुंडये ते नावगे क्रॉस रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खाड्यांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे एक फुटापर्यंत असल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणच्या रस्त्याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी वाहनधारक व या नागरिकांतून होत आहेत. लोकप्रतिनिधीही या मुख्य रस्त्याकडे दुर्लक्ष केले असल्याची माहिती स्थानिक नागरिक देऊ लागले आहेत. रणकुंडये क्रॉसपासून ते नावगे क्रॉस कदमनगरपर्यंतचा रस्ता अतिशय धोकादायक बनलेला आहे. खाड्यांमध्ये दुचाकी व इतर वाहने पडून अनेक किरकोळ अपघातांच्या घटना घडलेल्या आहेत. या खाड्यांमुळे मोठी दुर्घटना होण्याआधीच लोकप्रतिनिधी व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी करून या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
बेळगाव-चोर्ला रोडवरील रणकुंडयेपासून नावगे क्रॉसपर्यंतच्या रस्त्यावरून ये-जा करणे वाहनधारकांना मुश्कील बनले आहे. किणये, बहाद्दरवाडी, कर्ले, जानेवाडी, कावळेवाडी, बिजगर्णी, रणकुंडये, नावगे, संतिबस्तवाड, बेळवट्टी व पश्चिम भागातील वाहनधारकांची या रस्त्यावर रोज मोठ्या संख्येने वर्दळ असते. मात्र सध्या या ठिकाणी असलेल्या खाड्यांमुळे वाहनधारक आक्षरश: वैतागून गेले आहेत. गतवर्षी किणये ते पिरनवाडीपर्यंत काही ठिकाणी रस्त्याचे पॅचवर्क करण्यात आले. हे कामकाज सुरळीत करण्यात आले नसल्याच्या तक्रारी वाहनधारकांतून झाल्या. बऱ्याच ठिकाणी खड्डे असूनही ते बुजविण्यात आले नाही. त्यामुळे पॅचवर्कचे केवळ सोंग करण्यात आले. अशा तक्रारी या भागातील नागरिक करू लागले आहेत. तालुक्याच्या विविध भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत आहे. बेळगाव-चोर्ला रोडवरील रणकुंडये ते नावगे क्रॉस या मुख्य रस्त्याकडेच प्रशासनाचे दुर्लक्ष का झाले आहे? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
दुर्घटनेआधीच प्रशासनाने रस्त्याची दुरुस्ती करावी
नावगे क्रॉसजवळील रस्त्यावर खाड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे वाहतूक करणे डोकेदुखीचे ठरले आहे. गेल्यावर्षी या ठिकाणी पॅचवर्क करण्यात आले. मात्र ते कामकाज योग्य झाले नाही. पश्चिम भागातील वाहनधारकांसाठी हा मुख्य व महत्त्वाचा रस्ता आहे. खाड्यांमुळे मोठी दुर्घटना होण्याआधीच प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.
– परशराम सुरुतकर, नावगे
भलेमोठे खड्डे,वाहतुकीला धोका
रणकुंडये क्रॉसच्या उतरतीला भलेमोठे खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत. याठिकाणी समोरासमोरुन दोन वाहने आली तर केवळ एकच वाहन पास होऊ शकते, अन्य दुसऱ्या वाहनाला याच ठिकाणी थांबावे लागत आहे. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी मुश्किल बनला आहे. या भागात अनेक अपघातांच्या घटना घडलेल्या आहेत. या ख•dयांमध्ये एखाद्याचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?
– मंगेश पाटील, रणकुंडये









