कडोली परिसरातील भातपिकांची अवस्था बिकट : शेतकरीवर्ग चिंतेत, विहिरींच्या पाणीपातळीतही घट
वार्ताहर /कडोली
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमालीचे घटल्याने कडोली परिसरातील निम्म्याहून अधिक भातपिके वाळून गेली असून उत्पादनात मोठी घट जाणवणार आहे. शिवाय पावसाअभावी जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनत चालला असून विहिरीतील पाण्याची पातळी देखील आता 50-60 फुटापर्यंत गेल्याने पुढील काळात गावकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे वांदे येणार की काय? अशी भीती ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे. या पावसाळी हंगामात केवळ जुलै महिना वगळता आतापर्यंत सर्वच महिने कोरडे गेले आहेत. केवळ सप्टेंबर महिन्यात एक दोन वेळा पावसाचा शिडकावा झाला होता. परंतु याचा काही परिणाम पिकावर झाला नाही. त्यामुळे कडोली परिसरातील माळ शिवारातील बटाटे, रताळी, मका, भुईमूग आदी सर्व पिके वाळून गेली. तर पंपसेटधारक शेतकरी वगळता इतर सर्वच शेतकऱ्यांची भातपिके पूर्णपणे वाळून गेली आहेत. त्यामुळे यावर्षी भात उत्पादनात मोठी घट जाणवणार आहे. शिवाय चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. दरवर्षी माळ शिवारात बटाटे काढणी करून बाजरी, मका, जोंधळा पेरणी केली जात होती. यामुळे दोन-तीन महिने जनावरांना चाऱ्याची कमतरता पडत नव्हती. परंतु यावर्षी पावसाअभावी जमिनीत ओलावा नसल्याने कोणत्याही पिकाची पेरणी झाली नाही. परिणामी चाऱ्याची टंचाई प्रकर्षाने जाणवण्याची भीती व्यक्त होत आहे.
पाण्याची पातळी खालावली
दरवर्षी दसरा-दिवाळीच्या दरम्यान कडोली परिसरातील विहिरीतील पाण्याची पातळी पूर्णपणे भरलेली असायची. त्यामुळे त्यापुढील काळात पाणीटंचाईचा प्रश्न उग्र रूप धारण करत नव्हता. काही ठिकाणी पाणीटंचाई निर्माण होत होती. पण पिण्याच्या पाण्याचे वांदे कधी निर्माण झाले नव्हते. पण यावर्षी कडोली परिसरातील जाफरवाडी, कडोली, अगसगा, हंदिगनूर, केदनूर, मण्णीकेरी, देवगिरी, बंबरगा आदी भागात पावसाचे प्रमाण केवळ 25 टक्के झाले आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत कोणतीही वाढ झाली नाही. आजच्या घडीला विहिरीतील पाण्याची पातळी 50 ते 60 फुटापर्यंत खाली गेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणी दिवसा केवळ दोन-तीन तासात संपत आहे. आताच ही परिस्थिती झाली आहे. तर पुढे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे रब्बी हंगामात शेती व्यवसाय कोलमडणार की काय, अशी शक्यता आहे. कडधान्य पेरणीसाठी जमिनीत ओलावा असणे गरजेचे आहे. पंपसेटधारक शेतकऱ्यांच्या जमिनी वगळता सर्व शेतकऱ्यांच्या शेतजमिनी यावेळी ओसाड पडणार असे दिसत आहे. नजीकच्या पंधरा-वीस दिवसात वादळी पावसाची कृपा झाली तर कडधान्य पेरणी होणार अन्यथा कडधान्य पिकांनाही विसरावे लागणार आहे. शिवाय अशीच परिस्थिती राहिल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई भीषण जाणवणार असून पुढील काळात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचेही वांदे होणार की काय? अशी भीती ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.









