शिवप्रतिष्ठानच्या बैठकीत निर्णय : राज्याभिषेक दिन, भक्ती-शक्ती संगम कार्यक्रमांबाबत चर्चा
बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव शहर व तालुक्यातील धारकऱ्यांची व्यापक व महत्त्वाची बैठक पार पडली. हिंदू तिथीनुसार धर्मवीर संभाजी महाराज जयंती ज्येष्ठ शुद्ध द्वादशी 7 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक शंभुतीर्थ या ठिकाणी संभाजी महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा करून जयंती उत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 9 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यानंतर प्रतिवर्षाप्रमाणे देवदर्शन यात्रा छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून श्री कपिलेश्वर मंदिरापासून निघणार आहे. पालखी, वारकरी दिंडी, ढोल पथक, झांज पथक, लेझीम पथक, लाठी, हत्ती-घोडे अशा भव्य स्वरुपामध्ये देवदर्शन यात्रा निघणार असून बेळगावमधील महिला भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
त्याचबरोबर 20 जून रोजी पुणे येथे भक्ति-शक्ती संगमाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 12 वाजता जंगली महाराज रोड, जंगली महाराज मंदिर येथे बेळगाव जिल्ह्यातील सर्व धारकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी शिवप्रतिष्ठानचे कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे, जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, हिरामणी कंग्राळकर, किरण बडवाण्णाचे, प्रमोद चौगुले, शिवाजी मंडोळकर यासह इतर उपस्थित होते.
भिडे गुरुजी रविवारी बेळगावात
तिथीनुसार साजरा होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन व पुणे येथे होणाऱ्या भक्ती-शक्ती संगम कार्यक्रमाच्या प्रचारासाठी रविवार दि. 1 जून रोजी संभाजी भिडे गुरुजी बेळगावमध्ये येणार आहेत. सायंकाळी 5 वाजता अनसूरकर गल्ली येथील छत्रेवाडा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी शहरासह तालुक्यातील धारकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









