पलूस / वैभव माळी :
यंदा पावसाने वेळेच्या अधीच हजेरी लावल्याने द्राक्ष बांगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. मार्चमध्ये सर्व बागांची छाटणी होत असते. त्यानंतर सुमारे चाळीस ते साठ दिवस बांगाना ऊन हवे असते. ते उन न मिळाल्याने बांगामध्ये गर्भधारणा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर्षी द्राक्षबागायतदारांना मोठा फटका बसणार आहे. अतिप्रमाणात पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले असल्याने औषध फवारणी करताना बांगायतदारांना तारेवरची करसत करावी लागत आहे.
द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पलूस तालुक्यातील बागायतदारांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. गेल्या काही तीन वर्षाच्या तुलनेत गत वर्षी चांगला माल निघाला मात्र ढगाळ वातावरणाचे परिणाम सांगून दराचा मेळ बसला नाही. तर यावर्षी मे महिन्यातच पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने यंदा द्राक्षबांगायतदारांच्या समोर मोठे संकट उभे राहिले आहे. हवेतील अद्रातेमुळे पिकांवर करपा व डवण्या रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. परंतु शेतात पाणी साचून राहिल्याने औषध फरवाणी करताना अडचण भासू लागली आहे. त्यातूनही काही बागायतदार एक ट्रॅक्टर औषध फवारणीसाठी तर दुसरा ट्रॅक्टर चिखलातून बाहेर काढण्यासाठी असे जुगाड करताना दिसत आहेत. पलूस व परिसरात सुमारे दोन हजार एकर द्राक्ष बागायतीचे क्षेत्र आहे. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज पाहून द्राक्ष बागा काढल्या आहेत. तसेच काही शेतकरी ऊस, गहू, हरभरा, भाजीपाला याकडे वळले आहेत.
द्राक्षबागा तयार करण्यासाठी एकरी दोन लाखाहून अधिक खर्च येत असतो. तो खर्च पहिल्या दोनवर्षात निघतो. त्यानंतर मिळणाऱ्या नफ्यावर शेतकरी आपले नशिब आजमावत असतो. यावर्षी अत्यंत बिकट परिस्थिती द्राक्षबागांची झालेली आहे. गेल्या दहा वर्षात असे कधीही झाले नाही ते यावर्षी झाले. अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. एप्रिल, मे कडक उन असते तर जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडयात पावसाचे आगमन होत असते. त्यामुळे बागांमधील गर्भधारणा पूर्ण झालेली असते. परंतु यावर्षी उलट झाल्याने द्राक्ष शेती अर्थिक संकटात सापडली आहे. येथून पुढे अजून दोन महिने पावसाचे वातावरण राहणार आहे. द्राक्ष शेतीसाठी घातक असे वातावरण असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
द्राक्ष शेतीवर अंवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे. बागांना योग्य प्रमाणात ऊन मिळण्यासाठी किमान पंधरा दिवस तरी पावसाची उघडीप असणे अपेक्षीत आहे. परंतु हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार एकच दिवस सूर्यप्रकाश राहणार आहे. त्यानंतर ढगाळ वातावरण व पाऊस अशीच परिस्थिती राहणार आहे. द्राक्ष बागावर शेतकरी व मजूर दोन्हीचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे बागायतदारांच्या बरोबरच हजारो कुटुंबांचा रोजगार देखील बुडणार आहे.
सध्याच्या वातववणात बागेवर करपा व डवण्या दोन्ही रोगांनी चाल केली आहे. पाणी साचून राहिल्याने मुळ्यांना धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत द्राक्ष बागा टिकवणे जिकीरीचे बनले आहे. पुढील वर्षी अंत्यत कमी प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन होणार आहे. मिळणारे उत्पादन व त्यावर केलेला खर्च, मिळणारा दर यावर्षी द्राक्ष बांगायतदाराचे भवितव्य अंवलंबून राहणार आहे.
- द्राक्ष बागायतदारांना कर्जमाफी द्या
द्राक्ष बागायतदार हा देखील एक शेतकरी आहे. त्याने पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक रोजगार देणारा बागायातदार आज दुसऱ्याच्या शेतात रोजगारासाठी जाईल की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. द्राक्ष शेती वाचवायची असेल तर द्राक्षबागासाठी सहा महिन्यासाठी असलेला पीक विमा वर्षभर करावा. बागायतदार मोठ्या अर्थिक अडचणीत सापडला आहे. याचा सरकारने विचार करावा. इतर शेतकऱ्यांप्रमाणे त्यांना कर्ज माफी करावी.
– मारूती चव्हाण, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्षबागायतदार संघ








