15 दिवसांपासून प्रकार सुरू, प्रशासनाचे दुर्लक्ष, त्वरित दुरुस्तीची नागरिकांची मागणी
बेळगाव : शहरातील विविध भागात अत्यल्प पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर काही भागात 10 ते 15 दिवस पाणीपुरवठा करण्यात आला नाही. तर दुसरीकडे जलवाहिन्यांच्या गळत्यांद्वारे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सर्किटहाऊसजवळ जलवाहिनीद्वारे पहाटेपासून पाणी वाया जात आहे. गेल्या 15 दिवसांपासून हा प्रकार सुरू असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. जलवाहिन्यांच्या गळत्यांद्वारे हजारो लिटर पाणी वाया जात असून नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जलवाहिन्यांची दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे. पण याकडे एलअॅण्ड टी कंपनाचे दुर्लक्ष झाल्याची टीका नागरिक करीत आहेत. मध्यवर्ती बसस्थानकाजवळ पहाटे 4.30 पासून 9 वाजेपर्यंत जलवाहिनीद्वारे मोठ्याप्रमाणात पाणी वाया जाते. सदर पाणी सर्किटहाऊस समोरील रस्त्यावरून वाहत असते. त्याचप्रमाणे खडेबाजार कॉर्नरजवळ देखील वॉल्व्हद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी जात असते. जलवाहिन्या फुटल्याने आणि वॉल्व्ह खराब झाल्याने पाणी वाहत असल्याचे निदर्शनास आले आहे. मध्यवर्ती बसस्थानक-सर्किटहाऊस परिसरातून वाहणाऱ्या पाण्याबाबत महापालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. पण 15 दिवस झाले तरी याची दखल घेण्यात आली नाही. तसेच गणपत गल्ली
कॉर्नरवरील वॉल्व्हची दुरुस्ती वेळोवेळी केली जाते. तरीदेखील पाणी वाया जाण्याचे थांबत नाही. त्यामुळे एल अॅण्ड टीकडून कशाप्रकारे दुरुस्ती केली जात आहे, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. चांगल्या प्रतिचे वॉल्व्ह बसवून या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी गणपत गल्ली परिसरात सतत पाणी वाहत असल्याने बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना आणि व्यावसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही भागात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते, तर दुसरीकडे पाणी वाया जात असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गळत्यांच्या निवारणासाठी एलअॅण्ड टी कंपनीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.









