गवतगंजींना आगी लागण्याच्या प्रकारांत वाढ, शेतकऱ्यांतून संताप
वार्ताहर /कडोली
अज्ञात व्यक्तीकडून गवतगंज्यांना आगी लावण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने कडोली परिसरातील शेतकरी वर्गात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कडोली येथे शिवारात गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने गवतगंजी जळून खाक झाली आहे. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. भात पिकाच्या मळव्या करून बहुतांशी शेतकरी गवतगंज्या शेतशिवारात ठेवतात. आणि एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान सदर गवतगंज्या गावाकडे आणतात. गवतगंज्यांना आग लावून मूक जनावरांच्या पोटावर आड येण्याचा प्रयत्न आजतागायत कोणीही हे कृत्य केले नाही. पण अलिकडे जनावरांबद्दल कोणतीही जाण नसलेले अज्ञात व्यक्ती गवतगंज्यांना आग लावण्याचे कृत्य करताना पहावयास मिळत आहे. परंतु या प्रकारामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. गवताचा वाढलेला भरमसाठ दर पाहता गरीब शेतकऱ्याला विकत घेणे अवघड आहे. शिवाय विकत घ्यावं म्हटल तरी गवत मिळणे त्याहूनही अवघड आहे.
शेतकऱ्याचे 25 हजाराचे नुकसान
अज्ञात व्यक्तींकडून वारंवार गवतगंज्यांना आग लावण्याचे प्रकार घाडत असल्याने शेतकरी वर्गात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गुरुवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीने विनोद बाळू पावणोजी या शेतकऱ्याच्या शिवारातील गवत गंजीला आग लावल्याने गवतगंजी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्याचे सुमारे 25 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. या महिन्याभरात कडोली परिसरात सुभाष शिंदे, म्हात्रू पाटील, सुरेश कुट्रे आदी शेतकऱ्यांच्या गवत गंज्यांना आगी लावण्याचे प्रकार घडविण्यात आले. गुंजेनहट्टी येथेही एका गवत गंजीला आग लावून नुकसान करण्यात आले. तेव्हा असे प्रकार घडत राहिल्यास काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशा समाजकंटक अज्ञात व्यक्तींवर नजर ठेवून धरपकड करणे गरजेचे आहे.









