कोल्हापूर / संतोष पाटील :
सर्वोच्च न्यायालयाने येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने सरकारला प्रभाग रचना करण्याबाबत निर्देष दिले आहेत. एकल प्रभाग रचनेऐवजी बहुसदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार असल्याचे संकेत आहे. महापालिकेत 81 वरुन 91 तर जिल्हापरिषदेत पाच ते आठ गट वाढण्याची शक्यता आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चिती होईपर्यंत इच्छुकांची धाकधूक वाढणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 2022 पूर्वीच्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होण्याची शक्यता आहे, परंतु नव्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार काही बदल अपेक्षित आहेत. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप रचना तयार करून नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करावी, असे निर्देश दिले आहेत. आयोगाच्या सुचनेनुसार कोल्हापूर–इचलकरंजी महापालिका, जिल्हापरिषद, पंचायत समित्या, नगरपरिषदा, नगर पंचायतींच्या प्रभाग रचनेची कार्यवाही लवकरच सुरू होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग, गट आणि गण फेररचनेची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
- बहुसदस्य पद्धतीने होणार पालिका निवडणुका
भाजपने पहिल्यापासूनच बहुसंख्य प्रभाग रचनेचा आग्रह केला आहे. तर काँग्रेस आघाडीचा एकल प्रभाग रचनेवरच भरवसा आहे. भाजपने यापूर्वी जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचे प्रयोग केले होते. जनतेतून महापौर निवड करण्याचे संकेतही 2017 मध्ये दिले होते. 2019ला सत्तांतर झाल्याने बारगळले. जनतेतून नगराध्यक्ष निवडल्याने सभागृहात सत्ता नाही आली तरी नगरपालिकेचा ताबा आपल्याकडे राहिल असे प्रयोजन होते. निवडून आलेल्या बहुसंख्य नगराध्यांना 2019 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीही दिली होती. जनतेतून थेट निवडून आलेला उमेदवार हा संभाव्य जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा उमेदवारीचा चेहरा होता. भाजपच्या धोरणाचा विचार केला तर महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका या बहुसदस्य पद्धतीने होण्याची शक्यता अधिक आहे. राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. महायुती सरकारने मुंबई वगळता पालिका निवडणुका या बहुसदस्य पद्धतीने घेण्याचे धोरण राबविले आहे.
- कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना
कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या 81 प्रभाग आहेत, परंतु लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणानुसार आणि प्रशासकीय गरजेनुसार ही संख्या 91 प्रभागांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. दोन प्रभाग मिळून एक बहुसदस्यीय प्रभाग होणार यामुळे अपक्ष उमेदवारांचा टिकाव लागणे अशक्य होईल. यामुळे पक्षीय राजकारणाचा कोल्हापुरातील स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 2009 पासून सुरू झालेला बोलबाला यंदा अधिक प्रबळ होईल.
- जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची गट–गण रचना
कोल्हापूर जिल्हा परिषदेत सध्या 67 गट आणि 134 पंचायत समिती मतदारसंघ (गण) आहेत. यामध्ये लोकसंख्येच्या आधारावर काही बदल होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गण रचनेत बदल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. यानुसार, जिह्यातील 12 तालुक्यांमधील लोकसंख्येचे पुनर्मूल्यांकन करून गट आणि गणांची संख्या वाढवली किंवा कमी केली जाऊ शकते. नव्या गट आणि गण रचनेमुळे ग्रामीण भागातील मतदारसंघांचे राजकीय समीकरण बदलू शकते. राधानगरी, कागल, करवीर, हातकणंगले, शिरोळ, चंदगड, आजरा, गडहिंग्लज या तालुक्यांमध्ये गट आणि गण रचनेत बदल झाल्यास स्थानिक राजकीय पक्ष आणि नेत्यांना आपली रणनीती नव्याने आखावी लागेल.
- प्रशासकीय लगबग
कोल्हापूर जिह्यात एक महानगरपालिका (कोल्हापूर), 10 नगरपालिका आणि 1,029 ग्रामपंचायती आहेत. जिह्यातील 12 पंचायत समित्या आणि 67 जिल्हा परिषद गट ग्रामीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. नव्या निवडणुका घेण्यासाठी प्रभाग, गट आणि गण रचनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू होईल. यानंतर ऑक्टोबर महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे अपेक्षित आहे.
- लेखा जोखा
कोल्हापुरात कोल्हापूर आणि इचलकरंजी (नवनिर्मित) दोन महापालिका आहेत. कोल्हापूर शहरात 81 प्रभाग आहेत. दक्षिण विधानसभा 36 प्रभाग आहेत. उत्तर विधानसभा मतदार संघात 45 प्रभाग येतात. जिल्हा परिषदेचे एकूण 67 मतदारसंघ आहेत, तर पंचायत समितीचे 134 मतदारसंघ आहेत. चंदगड, आजारा, गडहिंग्लज, मुरगगुड, कागल, पन्हाळा, मलकापूर, वडगांव, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड या नगरपालिका आहेत.








