20 जणांवर उपचार : अशुद्ध पाणीपुरवठ्याचा परिणाम : दखल घेण्याची मागणी
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
खासगी विहिरीचे पाणी पिल्याने कलमेश्वर गल्लीतील 18 ते 20 नागरिकांना उलटी, जुलाबची लागण झाल्याची घटना मंगळवारी घडली. लागण झाल्याचे समजताच कडोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी तात्पुरते उपचार केल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर रुग्णांना घरी पाठविण्यात आले. उलटी जुलाबमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रा. पं. व कंत्राटदार यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांवर अशुध्द पाणी पिण्याची वेळ आली असल्याची संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
नागरिकांना 24 तास घरोघरी पाणी मिळावे यासाठी पाईप घालण्यासाठी खोदाईचे काम चालू करताना पूर्वीच्या सार्वजनिक नळाना पाणी पुरवठा सुरू राहणे याचे योग्य नियोजन न करता पाईपलाईन खोदाई केल्यामुळे पूर्वीच्या पाईपची मोडतोड झाली. त्यामुळे कलमेश्वर गल्ली, लक्ष्मी गल्ली व नेताजी गल्लीतील सार्वजनिक नळाना कमी प्रमाणात तेही महिन्यातून एकदा पाणी येते. ते पाणी कोणीही वापरत नाहीत. पिण्यासाठी कलमेश्वर गल्लीतील खासगी विहिरींचे पाणी वापरतात. मात्र तेही अशुद्ध असल्याने ग्रा. पं. ने परिस्थिती ओळखून त्या विहिरीमध्ये जंतूनाशक पावडर टाकणे गरजेचे होते. परंतु ग्रा. पं. ने तेही न केल्याने अखेर नागरिकांना अशुध्द पाणी पिल्याने उलटी जुलाबला सामोरे जावे लागत आहे. यामुळे 10 ते 20 नागरिकांना याची लागण झाली आहे. याबाबत शासकीय अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर मंगळवार सायंकाळी 5 वाजता ता. पं. चे आरोग्य अधिकारी डॉ. शिवानंद, अधिकारी धनवाडकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यधिकारी डॉ. विनायक, आरोग्य साहाय्यिका वर्षा घोडके, ज्योती सिस्टर, पीडीओ विवेक गुरव आदींनी गावाला धावती भेट देऊन लागण झालेल्या नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली. व त्यांच्यावर ताबडतोब उपचार करण्याचे आदेश दिले.
नागरिकांकडून अधिकारी धारेवर
कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांवर अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे. असे अनेक प्रश्न विचारत उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले. यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा कौसरजहाँ सय्यद, सद्याप्पा राजकट्टी, बंदेनवाज सय्यद, दत्ता पाटील, सुरेश राठोड आदींनी परिस्थितीची पाहणी केली.
जुन्या ग्रा. पं. मध्येच तात्पुरते आरोग्य केंद्र सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी
गावच्या स्मशानभूमीमध्ये सार्वजनिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. पण सध्या ते केवळ शोभेची इमारत बनली आहे. जुन्या ग्रा. पं. मध्ये भाजीमार्केट होणार आहे. तेथे नागरिकांच्या मागणीनुसार आरोग्य केंद्र उभारल्यास अधिक सोयीचे होणार आहे. सध्या रुग्णांवर भाजीमार्केट इमारतीमध्येच उपचार करण्यात आले.









