राष्ट्रीय महिला फेडरेशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : मणिपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत महिलांवर अत्याचार करण्यात आला आहे. महिलांना दिलेली वागणूक अत्यंत लज्जास्पद आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करून जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय महिला फेडरेशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मणिपूर हिंसाचाराच्या घटनेत महिलेवर अत्याचार केला आहे. विवस्त्र करून धिंड काढण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण जगामध्ये देशाची नाचक्की झाली आहे. मानवजातीला काळिमा फासणारी घटना असून या प्रकरणातील आरोपींवर कठोर शासन करण्यात यावे, याबरोबरच हरियाणा येथे दोन समुदायामध्ये मतभेद निर्माण होऊन जातीय दंगल सुरू झाली आहे. यामुळेही मोठा हिंसाचार झाला आहे. सदर हिंसाचार त्वरित थांबविण्यात यावा, सायबर गुन्ह्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. सायबरच्या माध्यमातून अनेकजणांची फसवणूक होत असून असे गुन्हे रोखण्यासाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणीही करण्यात आली.









