वार्ताहर /किणये
बेळवट्टी ग्राम पंचायतच्या अध्यक्षपदी विठ्ठल रामलिंग पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्राम पंचायत माजी अध्यक्ष बाळू मजुकर यांनी आपला अध्यक्षपदाचा कालावधी संपल्यामुळे राजीनामा दिला होता. सोमवारी अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया ग्राम पंचायतच्या कार्यालयात पार पडली. ग्रामविकास आघाडीचे विठ्ठल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून अशोक सुरूर व पीडीओ श्रीदेवी हिरेमठ हे होते. बेळवट्टी ग्राम पंचायतमध्ये बेळवट्टी, बाकनूर, इनाम बडस, धामणे एस. या गावांचा समावेश आहे. या ग्राम पंचायतीमध्ये एकूण 11 सदस्य आहेत. निवडणूक प्रक्रियेला 9 सदस्य उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्षा महादेवी मेदार, म्हाळु मजुकर, निशा चांदीलकर, रेश्मा कुलम, रेणुका सुतार, रूपा सुतार, अनुराधा कांबळे, धाकलु पाटील आदी उपस्थित होते. बेळवट्टी ग्रा. पं. अध्यक्षपदी विठ्ठल पाटील यांची निवड झाल्याबद्दल माजी महापौर शिवाजी सुंठकर, एपीएमसी माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, पुंडलिक पावशे, नानु पाटील, नारायण सांगावकर, किसन सुंठकर, मनोहर संताजी, नारायण कांबळे, कृष्णा कांबळे, यल्लाप्पा अष्टेकर आदींनी त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.









